मोठी बातमी समोर येत आहे, आज सकाळी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर आता राज्यपालांकडूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. वातावरण चांगलंच तापलं होतं. सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपावला होता. तसेच एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी सीआयडीनं या प्रकरणात आरोप पत्र दाखल केलं होतं. वाल्मिक कराड हाच या घटनेचा मास्टर मांईड आहे, संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असं सीआयडीनं आपल्या आरोप पत्रात म्हटलं होतं. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला होता.
त्यानंतर सोमवारी सांयकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरोपींनी संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपद्धतीनं हत्या केली. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एक तीव्र संतापाची लाट आहे, वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. देवेंद्र फडणीस यांच्या आदेशानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे.
राज्यभरात संतापाचं वातावरण
संतोष देशमुख यांची आरोपींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली, त्यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात संतापाची लाट पसरली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.