टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरआधी गुंडाळलं आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरही खेळून दिलं नाही. टीम इंडियाने कांगारुंना 49.3 ओव्हरमध्ये 264 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 265 धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाने भागीदारी करत टीम इंडियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी कांगारुंना झटके देत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे आता गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. स्टीव्हनने 96 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 73 रन्स केल्या. अॅलेक्स कॅरी याने 57 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटाकारासह 61 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी या दोघांव्यतिरिक्त एकालाही 40 पार मजल मारुन दिली नाही. मात्र ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन दोघांनी घट्ट पाय रोवून टीम इंडियाचं टेन्शन वाढवलेलं. मात्र या दोघांना योग्य क्षणी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हेडने 39 आणि लबुशेन याने 29 धावा जोडल्या. तर बेन द्वारशुइस याने 19, जोस इंग्लिसने 11 आणि नॅथल एलिसने 10 धावांचं योगदान दिलं. ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी 7-7 धावा केल्या.तनवीर सांघा नाबाद 1 धाव करुन माघारी परतला. कूपर कॉनोली याला भोपळाही फोडता आला नाही.
तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती याने ट्रेव्हिस हेडसह बेन द्वारशुइस याला मैदानाबाहेर पाठवलं. रवींद्र जडेजाने दोघांना बाद केलं. तर अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तसेच श्रेयस अय्यर याने रॉकेट थ्रो करत अॅलेक्स कॅरी याला 61वर रन आऊट केलं.
टीम इंडियासमोर 265 धावांचं आव्हान
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.