भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरे यांनी अर्धशतके केली. दरम्यान, स्मिथला त्याच्या खेळीच्या सुरुवातीलाच जीवदान मिळाले होते, ज्याचा फायदा त्याने घेतला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यानंतर त्यांनी पहिल्या १० षटकात दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथ मार्नस लॅबुशेनसह डाव सावरत होता. याचवेळी १४ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता.
त्याने या षटकातील टाकलेल्या शेवटच्या चेंडूचा स्पर्श स्मिथच्या पॅडला झाला आणि चेंडू मागे स्टंपकडे गेला. चेंडू स्टंपला लागलाही मात्र त्यावरील बेल्स न पडल्याने स्मिथला जीवदानमिळाले. त्यावेळी स्मिथ ३१ चेंडूत २३ धावांवर नाबाद खेळत होता.
स्मिथने या जीवदानाचा फायदा घेत नंतर अर्धशतक ठोकले. त्याने आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी असा पराक्रम केवळ सचिन तेंडुलकरने केला आहे. स्मिथने ७ वेळा आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत फलंदाजी केली असून त्यातील ५ वेळ ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
सचिन तेंडुलकरने १४ वेळा आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत फलंदाजी केली असून ६ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या दोघांव्यतिरिक्त आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत कोणालाच ५ वेळा ५० धावांची खेळी करता आलेली नाही.
स्मिथने नंतर ९६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. तो बाद झाल्यानंतर ऍलेक्स कॅरेने ऑस्ट्रेलिया संघाची जबाबदारी घेत अर्धशतक झळकावलं. कॅरेने ५७ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली.
या दोघांव्यतिरिक्त ट्रॅव्हिस हेडने ३९ धावा केल्या, तर मार्नस लॅबुशेनने २९ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ ४९.३ षटकातच २६४ धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी २ विकेट्स घेता आल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १विकेट घेतली.