मुंबई : लाडक्या बहिणींची अखेर प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनाची लॉटरी लागली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्याचे हप्ते खात्यात जमा होणार आहेत. मंत्री आदिती तटकरी यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
राज्य सरकारची गेम चेंजर ठरली. या योजनेतून लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य म्हणून महिन्याला १५०० रुपये दिले जातात. निवडणुकीच्या आधीपासून राज्यात लाडकी बहीण योजना लागू आहे. निवडणुकीनंतरही महिलांनी राज्यात लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महायुतीला साथ दिली. महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरु केली.
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचे काही हप्ते लाडक्या बहीणांना मिळाले आहेत. त्यानंतर मागील महिन्याचा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता. त्यानंतर आज आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे.
आदिती तटकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, 'लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल'.
दहा हजार लाडक्या बहिणी अपात्रजिल्ह्यातील दहा हजार लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. अमरावतीमधील या अपात्र दहा हजार लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणे बंद होणार आहे. चारचाकी वाहन,अडीच लाखांहून अधिक उत्पन्नाचा परिणाम झाला. अमरावती जिल्ह्यातील २० महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली. अमरावती जिल्ह्यातील 6 लाख 98 हजार 536 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.