उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : भाईंदर, काशीमिरा रस्त्यावरील लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या उड्डाणपुलाचा मुहूर्त अखेर नक्की झाला आहे. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
भाईंदर, काशीमिरा या मुख्य मार्गावरील एस. के. स्टोन उड्डाणपूल बांधून तयार आहे; परंतु तो वाहनांसाठी खुला होत नसल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. ४) प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यानंतर ८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण होणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली. मिरा रोड येथील न्यायालयाचे लोकार्पण सोहळ्यालाही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे.
उड्डाणपुलाची काही किरकोळ कामे तसेच तांत्रिक बाबी बाकी असून त्याची पूर्तता शुक्रवार (ता. ७)पर्यंत करण्याच्या सूचना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या आधी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. त्याबाबत सरनाईक यांना विचारले असता उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते; परंतु त्यांनीच दिलेल्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले जात आहे, असा खुलासा त्यांनी केला.
भाईंदर ते काशीमिरा या मुख्य रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. या उड्डाणपुलांना धर्मवीर आनंद दिघे, लोकनेते गोपीनाथ मुंडे, तसेच उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांची नावे देण्यात येतील, असेही प्रताप सरनाईक यांनी या वेळी सांगितले.