कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
esakal March 05, 2025 12:45 AM

कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
स्थानिक उमेदवारांची मागणी; आंदोलनाचा इशारा
कासा, ता. ४ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघरअंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना निवेदन देण्यात आले. शासनाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र, परंतु टीईटी/सीटीईटी अपात्र स्थानिक उमेदवारांनाही संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक उमेदवारांना संधी न दिल्यास बुधवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पालघर येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनास होणाऱ्या परिस्थितीस स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या मागणीसाठी हसमूख कनू दुबळा, बिपीन लालू तुंबडे, मगन रमता भोये यांच्यासह अनेक उमेदवारांनी पाठिंबा दर्शविला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.