आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आणि आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान महिला त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. या त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिकेत वूमन्स टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. श्रीलंकेकडे या मालिकेचं यजमानपदाचा मान आहे. मालिकेला 27 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर 11 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. ही त्रिसदस्यीय मालिका आगामी वनडे वर्ल्ड कपची रंगीत तालिम असणार आहे.
या मालिकेचं आयोजन हे राउंड रॉबिन पद्धतीने करण्यात आलं आहे. या मालिकेत प्रत्येक संघ 4-4 सामने खेळणार आहे. सर्व सामने हे दिवसा खेळवण्यात येणार आहेत. तसेच सर्व सामने हे एकाच मैदानात पार पडणार आहेत. त्यामुळे तिन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचेल, परिणामी सरावासाठी अधिक वेळ देता येईल. सर्व सामने हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. मालिकेतील सलामीचा सामना 27 एप्रिलला होणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध यजमान श्रीलंका भिडणार आहेत.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, त्रिकोणी मालिकेत प्रत्येक संघ 4 सामने खेळेल. अव्वल 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 11 मे ला फायनल मॅच होईल. त्यानंतर विजेता आणि उपविजेता संघ निश्चित होईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 27 एप्रिल, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 29 एप्रिल, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया, 4 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, 6 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
अंतिम सामना, 11 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
आगामी वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. तिन्ही संघांनी या वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे. आयसीसी वनडे रँकिंगमधील स्थानाच्या आधारावर 8 संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. अशात ही ट्राय सीरिज तिन्ही संघांसाठी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सरावाच्या आणि अनेक दृष्टीने मदतशीर ठरणार आहे.