डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरात अनेक लैंगिक गुन्हे होत आहेत. यात अनेक महिला आणि तरुणींना अतिशय वेदनादायी अनुभवांमधून जावं लागतं आहे.
अनेकजणींचं आयुष्य त्यामुळे कायमचं बदलतं आहे. त्यातही या घटना जर शाळेत आणि त्याही विद्यार्थ्यांकडून शिक्षिकांच्या बाबतीत होत असतील तर त्याचं गांभीर्य आणि वेदना अधिक असते. या प्रकारच्या घटनांनी दक्षिण कोरियातील शिक्षिकांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.
त्यांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे, तिथल्या शाळा आणि शिक्षण मंत्रालय याबाबत काय करतं आहे, शिक्षिकांची स्थिती काय आहे, याच्या धक्कादायक माहितीचा उलगडा करणारा हा लेख.
ली गा-युन यांना अनेकवेळा घरी असताना त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाकडून दिलासा दिला जात असताना अश्रू अनावर होतात.
गेल्या दशकभरापासून त्या दक्षिण कोरियातील बुसान शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून आनंदानं काम करत होत्या.
मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. एका विद्यार्थ्यानं त्यांना त्यांचा चेहरा एका नग्न शरीरावर लावल्याचा फोटो दाखवला तेव्हा त्या हादरून गेल्या. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा चेहरा दुसऱ्या कोणाच्या तरी नग्न शरीरावर लावण्यात आला होता.
तो फोटो टेलीग्राम चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. तिथे टेलीग्रामच्या जवळपास 1,200 सदस्यांनी 'ह्युमिलिएटिंग टीचर्स' (शिक्षकांना अपमानित करा) असे हॅशटॅग वापरले होते.
गा-युन (हे त्यांचं खरं नाव नाही) यांना वाटतं की, त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा हा डीपफेक फोटो पाहिला होता.
"ते जेव्हा माझ्याकडे पाहत असत, तेव्हा मला वाटायचं की त्यांनी माझा हा फोटो पाहिला तर नसेल ना आणि त्या फोटोतील ती मीच आहे याची ते खातरजमा करून घेण्यासाठी माझ्याकडे पाहत आहेत. मी त्यांच्या डोळ्यात पाहू शकत नव्हते आणि मला नीट शिकवता येणं शक्य होत नव्हतं," असं गा-युन सांगतात.
सात महिन्यांपासून त्या वैद्यकीय रजेवर आहेत.
"लहानपणापासूनच मला शिक्षिका व्हायचं होतं. ते नेहमीच माझं स्वप्न होतं आणि ते कधीही बदललं नाही," गा-युन म्हणतात.
"मात्र आता नैराश्य आणि चिंतेमुळे, मला दररोज पाच गोळ्या घ्याव्या लागतात. मला अजूनही हतबल झाल्यासारखं वाटतं. पूर्वपदावर येण्यासाठी, यातून सावरण्यासाठी मला थोडा काळ लागेल, असं मला वाटतं," असं त्या म्हणतात.
डीपफेकच्या घटना आणि शिक्षिकासाधारण वर्षभरापूर्वी, दक्षिण कोरियातील गाएओंगी प्रांतातील एका माध्यमिक शाळेतील इंग्रजीची शिक्षिका, जिला आम्ही पार्क सेही म्हणतो, तिचा देखील असाच डीपफेकद्वारे तयार करण्यात आलेला खोटा फोटो डिसिनसाई़ड नावाच्या वेबसाईटवर पब्लिश झाला.
त्यांचा मूळ फोटो एका मेसेजिंग ॲपवरून घेण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या ॲपचा वापर त्या फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी करत असत.
त्यांचा चेहरा आणि एका अज्ञात पुरुषाचा चेहरा एडिट करून लैंगिक कृत्य करणाऱ्या दोन माकडांच्या शरीरावर लावण्यात आला होता.
त्या फोटोबरोबर पुढील शब्द देण्यात आले होते, "पार्क सेही त्यांच्या मुलाबरोबर आयटी करताना."
त्या शिक्षिका म्हणाल्या की, त्यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही दिवस त्या मध्यरात्री झोपेतून उठायच्या, रागानं उशीवर बुक्के मारायच्या.
त्या पुढे म्हणाल्या, "मला माझा संताप आवरता येत नव्हता. मला प्रचंड असहाय्य वाटत होतं. त्यांनी त्यात माझ्या मुलाचाही समावेश केला ही गोष्ट माझ्यासाठी असह्य झाली होती."
"मी या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पहिल्या वर्षापासून होते. आम्ही तीन वर्षे एकत्र घालवली होती. मला त्यांची खरोखरच काळजी वाटायची. मी त्यांना खूप आवडायचे. आमचं अतिशय छान नातं होतं. ते खूप छान विद्यार्थी होते. त्यामुळे या सर्व प्रकारानं खूप मोठा धक्का बसला होता."
त्या शिक्षिकेनं सांगितलं की, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की, जर हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यानं ते कबूल केलं, तर त्या पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत. मात्र त्यांच्यापैकी कोणीही पुढे आलं नाही. शेवटी त्या पोलिसांकडे गेल्या.
मात्र पोलिसांनी त्यांना सांगितलं की, त्यांना कोणताही पुरावा सापडत नाही आणि पोलिसांनी त्यांची चौकशी न करताच, तिच्याशी चर्चा न करताच, ते प्रकरण बंद केलं. अखेरीस हे कृत्य कोणी केलं आहे, हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिला.
डीपफेकमुळे हादरलेला दक्षिण कोरियाशाळांमधील डीपफेक पॉर्नच्या वाढत्या घटनांमुळे दक्षिण कोरिया हादरला आहे. या प्रकारच्या घटनांचा 500 हून अधिक शाळा आणि विद्यापीठांवर परिणाम झाल्याचं वृत्त बीबीसीनं सप्टेंबर महिन्यात दिलं होतं.
ऑगस्ट 2024 मध्ये कोरियन टीचर्स अँड एज्युकेशन वर्कर्स युनियननं (केटीयू) एक सर्व्हे केला होता. त्यात त्यांनी विचारलं होतं की, शिक्षक आणि विद्यार्थी बेकायदेशीररित्या संपादन किंवा छेडछाड करून तयार करण्यात आलेल्या फोटोंना बळी पडले आहेत का? यावेळी 2,492 प्रकरणांची नोंद झाली होती.
या प्रकारच्या घटनांना बळी पडलेल्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शाळांमधील, तसंच अगदी बालवाडीतील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. एकूण 517 जणांना या प्रकारांचा फटका पडला होता. त्यात 204 शिक्षक होते, 304 विद्यार्थी होते आणि उर्वरित जण शाळांमधील कर्मचारी होते.
यातील अनेक पीडित कधीही पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवत नसले, तरीदेखील नोंदवल्या जाणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढते आहे.
दक्षिण कोरियामधील डीपफेकद्वारे केल्या जाणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांबाबतच्या पोलीस तक्रारींची संख्या 2021 मध्ये 156 होती. 2024 मध्ये ती वाढून 1,202 वर पोहोचली आहे. यावरून याप्रकारच्या गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात येते.
गेल्या वर्षी पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसतं की, या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या 682 जणांपैकी 548 जण किशोरवयीन मुलं होती. त्यातील 100 हून अधिक मुलं 10 ते 14 वर्षे वयोगटातील होती.
अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर खटला चालवता येत नाही आणि त्यामुळे शिक्षादेखील देता येत नाही.
डीपफेक पॉर्न गुन्ह्यांबद्दल लोक अधिकाधिक जागरूक होत असूनही, पोलिसांकडून मात्र शिक्षकांची निराशा होते आहे.
पोलिसांकडून निराशा झाल्यावर शिक्षिकेनंच लावला छडाइंचॉनमधील एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेचे फोटो, त्यांना आम्ही जिही नावानं संबोधत आहोत, एक्स या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये टाकण्यात आले होते.
त्यात त्यांच्या शरीराचे काही क्लोज-अप दाखवण्यात आले होते. त्या पोस्टला 'टीचर ह्युमिलिएशन' असा हॅशटॅग देण्यात आला होता.
त्या शिक्षिका म्हणाल्या की, त्या फोटोंबद्दल पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्या निराश झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ते प्रकरण स्वत:च हाताळायचं ठरवलं.
त्यांच्या लक्षात आलं की, ते फोटो एका विशिष्ट वर्गात घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी फोटोत दिसणाऱ्या वर्गातील खुर्च्यांच्या प्रत्येक कोनाचे बारकाईनं निरिक्षण केलं. जेणेकरून हे फोटो कोणी घेतले आहेत ते समजावं. अखेर तिसऱ्या वर्षाचा एक विद्यार्थी याबाबतीत संशियत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
"या प्रकरणात स्वत: पीडित असून देखील, माहिती गोळा करण्यासाठी ते फोटो मला सतत पाहावे लागत होते, ही अतिशय निराशाजनक बाब होती," असं जिही म्हणतात.
त्यांनी 10 पानांचा अहवाल सादर केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र त्यांनी यात पुरेसे पुरावे नसल्याचं म्हटलं.
मात्र जिही यांना ज्या विद्यार्थ्यावर संशय होता, त्याच्यावर त्यांच्या एका सहकाऱ्याशी संबंधित प्रकरणात आरोप झाले.
पीडित शिक्षिकांना रजा मिळेना, काम करणं झालं कठीणअशा प्रकरणांमधील पीडित शिक्षकांकडून त्यांनी त्यांचं काम पुढे सुरू ठेवण्याची अपेक्षा केली जाते. अगदी त्या प्रकरणातील संशयित विद्यार्थी अजूनही त्यांच्या वर्गात असला तरीदेखील.
विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळली जाते. विद्यार्थी एखाद्या डीपफेक गुन्ह्याला बळी पडल्याची तक्रार आल्यास त्यांना ताबडतोब त्या वर्गातून बाहेर काढलं जाऊ शकतं.
गा-युन यांच्यासारख्या काही शिक्षिकांनी आजारपणाची रजा घेतली आहे. मात्र ती रजा एक आठवड्यापेक्षा जास्त झाली, तर शाळेच्या समितीनं ती रजा मंजूर करण्यासाठी त्याचा आढावा घ्यावा लागतो.
कधीकधी रजेची विनंती नाकारली जाते. त्याचा अर्थ त्या परिस्थितीत पीडितेला तिच्या वार्षिक रजेचा वापर करावा लागतो.
नेहमीच्या बदलीच्या कालावधीव्यतिरिक्त मार्च महिन्यात शाळा बदलणं जवळपास अशक्य आहे.
"डीपफेकच्या घटनेमुळे मला त्रास होतो आहे की, शिक्षण अधिकाऱ्यांशी द्याव्या लागत असलेल्या लढ्यामुळे त्रास होतो आहे, हे मला माहित नाही," असं उसासा टाकत गा-युन म्हणतात.
किम सून मी बुसानच्या शिक्षण कार्यालयात शाळा पर्यवेक्षक आहेत. ते म्हणाले, "गुन्हेगार असलेल्या किंवा डीपफेकसारखे गुन्हे करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना ताबडतोब वेगळं कसं करावं किंवा किती काळ वेगळं ठेवण्यात यावं, हे सांगणारा कोणताही कायदा किंवा नियमावली नाही."
यासंदर्भात असलेलं एकमेव मार्गदर्शक तत्वं म्हणजे, जर एखाद्या विद्यार्थ्याच्या कृतींचा "इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर नकारात्मक परिणाम होत असेल", तर त्या विद्यार्थ्याला वर्गात मागच्या बेंचवर बसवलं जाऊ शकतं.
त्या विद्यार्थ्याला पालकांनी घरीच शिक्षण द्यावं अशी विनंतीदेखील केली जाऊ शकते. मात्र जर पालकांनी त्याला नकार दिला तर ते सक्तीचं केलं जाऊ शकत नाही.
विद्यार्थ्यांमध्ये डीपफेकच्या गुन्ह्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचं आव्हानगा-युन यांना असंदेखील वाटतं की डीपफेक पॉर्नच्या गांभीर्याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यासाठी आणखी बरंच काही करण्याची आवश्यकता आहे.
दक्षिण कोरियातील शिक्षण मंत्रालयानं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एक सर्व्हे केला होता. त्यात 2,000 हून अधिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यातून डीपफेकशी संबंधित गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्याचं दिसून आलं.
डीपफेकच्या लैंगिक गुन्ह्यांमागचं कारणं काय आहेत, याबद्दल विचारलं असता, 54 टक्के विद्यार्थ्यांनी हे "फक्त मजेसाठी किंवा मनोरंजनासाठी" केलं जात असल्याचं सांगितलं.
छळ करण्याचे किंवा त्रास देण्याचे इतरही प्रकार असू शकतात, असं गा-युन म्हणतात.
त्या सांगतात की, गेल्या वर्षी महिला शिक्षिकांच्या शौचालयात एका विद्यार्थ्यानं एक कॅमेरा बसवला होता.
त्या पुढे सांगतात की वर्गामध्ये काही विद्यार्थी वारंवार लैंगिक स्वरुपाच्या टिप्पण्या करतात आणि शिक्षिकांशी शारीरिक संपर्क व्हावा म्हणून वर्गातील इतर विद्यार्थ्यांना मुद्दाम शिक्षिकेकडे ढकलतात किंवा धक्का देतात.
त्या म्हणाल्या, "मी जेव्हा त्यांची ही वर्तणूक सुधारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते म्हणतात की 'ते फक्त गोंधळ घालत होते,' किंवा 'तो फक्त विनोदाचा किंवा गंमतीचा भाग होता.' त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव नसते. विद्यार्थी म्हणतात की असं करणं हा खरोखरंच एक गुन्हा आहे हे त्यांना माहित नव्हतं."
यु जी-वू (Yu Ji-woo) (हे त्यांचं खरं नाव नाही)16 वर्षांची आहे. ती म्हणते, तिची एक वर्गमैत्रीण डीपफेक पॉर्नची पीडित होती. या मुद्द्याबाबत देशभरात शिक्षण का दिलं जात नाही, हे तिला समजत नाही.
"एखादी घटना घडलेली असो किंवा नसो, आम्हाला अपेक्षा होती की देशभरातील शाळांमध्ये शिक्षण दिलं जात असेल. मात्र तसं काहीही घडलेलं नाही," असं ती म्हणते.
चुंग इल-सुन (Chung Il-sun), शिक्षण मंत्रालयात लिंग समानता धोरण विभागाच्या संचालक आहेत. त्या म्हणतात की, डीपफेक लैंगिक गुन्ह्यांकडे ते "अतिशय गंभीर बाब" म्हणून पाहतात.
त्या म्हणाल्या, "गुन्हेगारांना हाताळताना कोणतीही नरमाई किंवा ढिलाई दाखवली जाणार नाही आणि त्यांच्याविरोधात कठोर उपाययोजना केल्या जातील याची खातरजमा करण्यासाठी आम्ही शाळांना आणि शालेय समित्यांना सूचना पाठवल्या आहेत."
चुंग इल-सुन यांनी सांगितलं की शिक्षण, जागरुकता मोहीम आणि इतर प्रयत्नांद्वारे, "हा फक्त विनोदाचा भाग नाही तर तो एक गुन्हा आहे, हे विद्यार्थ्यांना समजावं यावर मंत्रालयाचं मुख्य लक्ष केंद्रीत आहे."
"शिक्षण मंत्रालयासह सरकारनं ही बाब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं आहे की डीपफेक कंटेंट हा गुन्हा आहे."
ली यॉं-से (Lee Yong-se) कोरियन नॅशनल पॉलिसी एजन्सीमध्ये वरिष्ठ निरीक्षक आहेत.
त्यांनी सांगितलं की, सायबर लैंगिक हिंसाचाराचा तपास करण्यासाठी प्रादेशिक पोलीस दलांमध्ये खास पथकं तयार करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना गुप्तपणे तपास करण्याचं आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आहे.
पोलीसदेखील म्हणाले की, त्यांनी केलेल्या कारवाईमुळे, या प्रकारच्या तक्रारींची संख्या घटली आहे. सप्टेंबरच्या विशिष्ट आठवड्यात दररोज सरासरी 17 तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. मात्र महिनाभरात त्यात घट होऊन दररोज सरासरी दोन तक्रारींवर हे प्रमाण आलं आहे.
डीपफेकमुळे शिक्षिकांवर झालेला मानसिक आघातजिही यांची इच्छा आहे की त्यांनी स्वत:चं डीपफेक कंटेंट पाहण्याआधी त्यांचं दैनंदिन आयुष्यं सुरू व्हावं.
त्या म्हणतात, "जर कोणी मला विचारलं की ही डीपफेकची घटना घडण्याआधीच्या काळात पुन्हा जाण्यासाठी मी कितीही रक्कम मोजण्यास तयार आहे का, तर मी नक्कीच तसं करेन, मग त्यासाठी किती पैसे मोजावे लागले तरी चालेल. माझी इच्छा आहे की ही आठवण माझ्या आयुष्यातून पुसली जावी आणि आधी गोष्टी जशा होत्या तशाच त्या पुन्हा व्हाव्यात."
मात्र त्याचबरोबर त्यांना त्या विद्यार्थ्यांचीही आठवण येते ज्यांनी त्यांना याबाबतची माहिती दिली आणि प्रोत्साहन देणाऱ्या नोट्स दिल्या.
गा-युन म्हणतात की त्या अशा दिवसाची वाट पाहत आहेत, ज्या दिवशी दोषी विद्यार्थी त्यांच्याकडे येतील आणि त्यांची माफी मागतील. एक शिक्षिका म्हणून त्यांना वाटतं की, विद्यार्थ्यांना त्यांच्या कृतींचं गांभीर्य समजेल, याची खातरजमा करणं हे त्यांचं कर्तव्य आहे.
"मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही हे लक्षात घ्या की हा फक्त विनोद नव्हता. मला वाटतं की नंतर तुम्हाला त्याबद्दल अपराधीपणाचं वाटलं असेल. गंमत म्हणून तुम्ही चेष्टा, खोड्या केल्या...मात्र त्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या," असं गा-युन थरथरत्या आवाजात म्हणतात.
"त्या घटनेनं माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे," असं त्या शेवटी म्हणाल्या.
युजिन चोई आणि ह्युनजुंग किम यांचं अतिरिक्त वार्तांकन.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)