पुणे - जेव्हा परिस्थिती तुम्हाला अनेक पातळ्यांवर हरवू पाहत असते आणि तुम्ही मात्र शरण न जाता आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर निराशेवर मात करत विजयश्री पटकावता, तेव्हा मिळणारा आनंद एखाद्या जग जिंकलेल्या वीरासारखा तुमच्या चेहऱ्यावर तेजस्वीपणे झळकत असतो. असाच काहीसा अनुभव भाग्यश्री माझिरे ही युवती घेत आहे.
भाग्यश्री ही मूळची पुण्याची. जन्मतःच पाठीच्या मणक्यावर गाठ दिसल्याने तिच्यावर शस्रक्रिया करावी लागली. त्यामुळे तिचा जीव वाचला, मात्र तिच्या कंबरेखालच्या सर्व संवेदना बंद झाल्या. मूत्र व शौचावर नियंत्रण राहिले नाही.
शस्त्रक्रियेमुळे गरजेपेक्षा जास्त दिवस पालथे झोपविण्यात आल्याने भाग्यश्रीच्या पायाचे तळवे वाकडे झाले. ती तीन वर्षांची असतानाच पायावर शस्त्रक्रिया करून पंजे ठीक करण्यात आले. पण काही महिन्यांतच ते पुन्हा आधीसारखे झाले आणि तिच्या पालकांना निराशेने घेरले.
हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप्ड कोल्हापूर या संस्थेच्या डॉ. नसीमा हुरजूक यांच्याबद्दलचा लेख भाग्यश्रीच्या वडिलांना वाचायला मिळाला. त्यामध्ये पॅराप्लेजिक व्यक्तीची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांनी स्वतः कसे जगले पाहिजे, याची माहिती होती. तिच्या वडिलांनी डॉ. नसीमा यांच्याशी संपर्क साधत कोल्हापूरमधील वसतिगृहात भाग्यश्रीला दाखल केले.
तिला चालता यावे म्हणून तिच्यावर पुन्हा शस्रक्रिया झाली; मात्र उपयोग झाला नाही. भाग्यश्री कायमची खुर्चीला जोडली गेली. वसतिगृहामुळे तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण लागले. शिक्षण, नृत्य, गायन, क्रीडा, सहली या शिक्षणोत्तर कार्यक्रमांत ती रमली. दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भाग्यश्रीचा गोळा फेक आणि थाळी फेक स्पर्धेमध्ये नंबर आला.
चेन्नईला नॅशनल स्पेशल ऑलिंपिक चँपियनशिपसाठी तिची निवड झाली. त्यात तिने दोन पदके मिळवली. तिने नॅशनल पॅरा ॲथलेट चँपियनशिपमध्येही तीन वेळा सहभाग घेतला आणि यशस्वी कामगिरी केली. त्यानंतर चीनमधील स्पर्धेसाठी तिची निवड झाली, परंतु पासपोर्ट बनविण्यात काही अडचणी आल्याने तिला जाता आले नाही. त्यानंतर बीकॉम व एमकॉम अभ्यासक्रमात ती प्रथम श्रेणीत पास झाली.
या स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा एकदा भाग्यश्रीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. विश्रांतीसाठी ती पुण्याला आल्यावर पुणे रायडर्स व्हीलचेअर बास्केटबॉलशी तिचा संपर्क आला. व्हीलचेअर बास्केटबॉलच्या खेळात रमल्यामुळे भाग्यश्रीची मानसिक, शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. डेकेथॉनमध्ये पॅरालिंपिक स्पोर्टबद्दल जनजागृती करणारी भाग्यश्री आता ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत आहे.
ॲथलिट व व्हीलचेअर बास्केटबॉल खेळामध्ये देशासाठी खेळून नावलौकिक वाढवायचा आहे. माझ्यासारखे कोणी दिव्यांग भेटले, तर त्यांना खेळाडू बनण्यासाठी प्रोत्साहन देते. मला वाटते सर्वांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी असले पाहिजे.
- भाग्यश्री माझिरे