मुंबई: ‘धारावी ही तुमची आहे आणि तुमचीच राहील’ असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धारावीकरांना गुरुवारी दिला. धारावीला दिलेल्या भेटीत त्यांनी चामड्याच्या वस्तू हाताने आणि मशीनवर शिवण्याचा अनुभव घेतला. दलित समाजाशी निगडीत असणाऱ्या या व्यवसायला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारने त्यांच्या मागे पाठबळ उभे करण्याची आवश्यकताही गांधी यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत धारावीच्या पुनर्वसनाचा मुद्दा लावून धरला होता. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी तसेच मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग असलेल्या धारावीला आज त्यांनी भेट दिली. चर्मोद्यागोसोबतच लघुउद्योगांच्या विस्तारासाठी जे काही सहकार्य करता येईल ते करण्यासाठी काँग्रेस तुमच्याबरोबर असेल, असे आश्वासन त्यांनी धारावीकरांना आश्वसित केले.
धारावीतील लघुउद्योग टिकून राहण्यासाठी त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हायला हवे. सरकारच्या माध्यमातून त्यांना सहाय्य मिळायला हवेच. धारावी हे भारताचे उत्पादन केंद्र व्हायला हवे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी या लघुद्योजकांना प्रोत्साहन दिले. राहुल गांधी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान धारावीतील चमार स्टुडिओ, मारुती लेदर क्राफ्ट, नेटके लेदर वर्क येथे भेट दिली.
त्याचप्रमाणे येथील रहिवासी सुरेंद्र कोरी यांच्या छोट्याशा घरात भेट देऊत तेथील कुटुंबाशी संवाद साधला. विशेष करून ‘चमार स्टुडिओ’ चालवणारे तरुण उद्योजक सुधीर राजभर यांची खास भेट घेतली. यावेळी चर्मकार उद्योग करणाऱ्या समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ‘चमार’ हा ब्रँड तयार केल्याचे राजभर यांनी राहुल गांधी यांना सांगितले. त्यांच्या उद्योगात राहुल गांधी यांनी स्वत: एका बॅगेला शिलाई करण्याचा प्रयत्न केला.
येथील नेटके लेदर वर्कला भेट देताना त्यांनी येथील लघुद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या. कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी कौशल्य विकास केंद्रे उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून सुनील नेटके, भाऊसाहेब तांबे यांना देण्यात आले. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना खास भेट म्हणून चांबड्याचे पॉकेट व बॅग या उद्योजकांकडून देण्यात आली.
याचबरोबर आपल्या पाच जणांच्या कुटुंबासह अत्यंत लहान घरात राहणाऱ्या सुरेंद्र कोरी यांच्या घरात जाऊन या कुटुंबाशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी आपण धारावी सोडून कुठेही जाणार नसल्याचे कोरी कुटुंबाकडून सांगण्यात आले. मुलुंडमध्येही जाणार नाही आमच्या पिढ्यान पिढ्या इथे गेले असल्याने धारावीतच राहणार अन्यत्र स्थलांतरित होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी धारावी ही तुमची आहे आणि तुमचीच राहील, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी या रहिवाशांना दिली. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धारावीकरांनी गर्दी केली होती. यावेळी खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.