वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स पुन्हा एक विजयी पथावर परतली आहे. युपी वॉरियर्सचा 6 गडी राखून पराभव केला. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. युपी वॉरियर्स मोठी धावसंख्या उभरणार नाही याची पुरेपूर काळजी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी घेतली. युपी वॉरियर्सकडून जॉर्जिया वोल सर्वात चांगली खेळली. तिने 33 चेंडूत 12 चौकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. दीप्ती शर्माने त्यातल्या त्यात 27 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून एमेलिया केरने सर्वोत्तम गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 38 धावा देत 5 गडी बाद केले. तर हिली मॅथ्यूजने 2, तर नॅट स्कायव्हर ब्रंट आणि परुणिका सिसोदिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
युपी वॉरियर्सने विजयासाठी दिलेलं आव्हान गाठण्यासाठी हिली मॅथ्यूज आणि एमेलिया केर ही जोडी मैदानात उतरली. हिली मॅथ्यूजने दमदार खेळी केली. तिने 46 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 68 धावा केल्या. तर नॅट स्कायव्हर ब्रंटने 37 धावांची खेळी केली. पण हरमनप्रीत कौर या सामन्यात काही खास करू शकली नाही. तिचा खेळ फक्त 4 धावांवर आटोपला. अमजोत कौर आणि यास्तिका भाटियाने नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.