मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना दिली जाईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. मात्र, आता लाडक्या बहिणींचं वेटिंग थोडं वाढणार आहे. आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना आता पैसे उद्याच मिळणार आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही उद्या लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत. आदिती तटकरे पुढं म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर आचारसंहिता असली तरी लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहेत. कुठलाही हप्ता गेला नाही जिथे आम्ही पैसे दिले नाहीत. प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याला आम्ही पैसे दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक लाडक्या बहिणींना आपला हप्ता मिळेल, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न दिला जात असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासंदर्भातील मागणी पंतप्रधानांकडे करायला हवी आणि पंतप्रधान सुद्धा याकडे सकारात्मक बघतील. असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. यामध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील विविध प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ 2 कोटी 52 लाख महिलांना देणार असल्याचं म्हटलं.
मुख्यमत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी, मार्च महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या वाढणार असल्याचं पाहायला मिळेल. जानेवारी महिन्यात या योजनेतील 2 कोटी 41 लाडक्या बहिणींना पैसे मिळाले होते. तर, डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 7 हप्त्यांचे 10500 रुपये मिळाले आहेत. आता दोन महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार असल्यानं लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 13500 रुपये जमा होतील.
इतर बातम्या :
अधिक पाहा..