लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी घरातले लोक रिसेप्शनची तयारी करण्यात गुंतले होते. सकाळी बराच वेळ झाला तरी नवविवाहित दाम्पत्य रूममधून बाहेर आले नव्हते. त्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला तरी उत्तर आलं नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा दोघांचेही मृतदेह कुटुंबियांना दिसल्यानं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अयोध्येत सहादतगंज मुरावन टोला इथं ही घटना घडलीय.
प्रदीपचं लग्न ७ मार्चला झालं आणि ८ मार्चला नवरीचा गृहप्रवेश झाला. तर ९ मार्चला रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. कुटुंबात आनंदी वातावरण होतं पण दोघांच्याही संशयास्पद मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. मृत्यू कसा झाला आणि यामागे काय कारण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रविवारी सकाळी उशीरापर्यंत नवरा-नवरी उठले नाहीत. घरच्या लोकांनी दरवाजा ठोठावून पाहिला तरीही काही उत्तर आलं नाही. शेवटी शंका आल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. तेव्हा प्रदीपचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर पत्नी मृतावस्थेत बेडवर पडली होती. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी या घटनेनंतर घटनास्थळी पंचनामा केला. फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले आहेत. आता शवविच्छेदन अहवालात काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. घरात रिसेप्शनची तयारी सुरू होती. कुटुंबातील नातेवाईक भाजी आणण्यासाठी बाजारातही गेले होते. स्टेज आणि लायटिंग याची तयारी करण्यात येत होती. त्याआधीच दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडालीय.