चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात वनडे मालिका सुरु होती. आयसीसी चॅम्पियनशिप वनडे मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला 98 धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 गडी गमवून 280 धावा केल्या आणि विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही श्रीलंकेला गाठता आलं नाही. श्रीलंकन संघ 50 षटकात सर्व गडी बाद 182 धावा करू शकला. न्यूझीलंडकडून पहिल्या विकेटसाठी सूझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर या जोडीने 108 धावांची भागीदारी केली. सुझी बेट्सने 69 चेंडूत 53 धावा केल्या. तर जॉर्जिया प्लिमरने 120 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडला 280 धावांपर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडने दिलेलं आव्हान गाठताना श्रीलंकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. विश्मी गुणरत्ने 6, चमारी अथापथु 5, हर्षिता समरविक्रमा 8, तर इमिशा दुलानी 11 धावा करून बाद झाले. तर मधल्या फळीत कविशा दिलहारी आणि निलाक्षी डीसिल्वा यांनी प्रत्येकी 45 धावा केल्या. मात्र या व्यतिरिक्त एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. न्यूझीलंडकडून जेस केर आणि फ्रॅन जोनास यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर एडेन कार्सनने 2, तर ब्रूक हालिडे आणि मॅडी ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): चामारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), इमेषा दुलानी, अचीनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, चेतना विमुक्ती, सचीला.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स (कर्णधार), जॉर्जिया प्लिमर, एम्मा मॅकलिओड, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेझ, जेस केर, पॉली इंग्लिस (विकेटकीपर), एडन कार्सन, फ्रॅन जोनास, ब्री इलिंग.