How much prize money did India win in ? भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदाचा १२ वर्षांचा दुष्काळ संपवला. त्याचसोबत २५ वर्षांपूर्वी न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिलेली जखमही आज भरून काढली. भारताने ४ विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत करताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेचे जेतेपद नावावर केला. मागच्या वर्षी भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा रोहित हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. या जेतेपदासह भारताने मोठी बक्षीस रक्कमही जिंकली.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ बाद २५१ धावा केल्या. वरुण चक्रवर्थी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. डॅरील मिचेल ( ६३) व मिचेल ब्रेसवेलने ( ५३) धावांची खेळी केली. रचिन रवींद्र ( ३७) व ग्लेन फिलिप्स ( ३४) यांनीही चांगला हातभार लावला. प्रत्युत्तरात, रोहित व शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करून विजयाचा मजबूत पाया घातला. मधल्या षटकात रोहित, गिल ( ३१) व विराट कोहली ( १) यांच्या विकेट्सने टीम इंडियाची धाकधुक वाढवली. पण, अक्षर पटेल व श्रेयस अय्यर यांनी किल्ला लढवला.
रोहितने ८३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. श्रेयस चुकीचा फटका मारून ६२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. अक्षरनेही २९ धावांवर विकेट फेकली आणि या विकेट्स पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाराज दिसला. लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांनी शेवटपर्यंत संघर्ष करताना भारताचा ऐतिहासिक विजय पक्का केला. हार्दिक १८ धावांवर माघारी परतला, परंतु तोपर्यंत भारत विजयाच्या नजीक पोहोचला होता. भारताने ६ बाद २५४ धावा करून विजय निश्चित केला. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला.
Champions Trophy 2025 prize Moneyआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंदाजे ६०.०६ कोटी इतक्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती आणि २०१७ च्या आवृत्तीपेक्षा तब्बल ५३% जास्त आहे. संघांना या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल १.०८ मिळाले. तसेच, गट फेरीतील प्रत्येक विजयासाठी संघाला अंदाजे २९ लाख दिले गेले. भारताने पहिल्या फेरीतील सर्व तीन सामने जिंकले, तर न्यूझीलंडने दोन विजय मिळवले. त्यामुळे भारताने अंदाजे ८८ लाख कमावले, तर न्यूझीलंडला अंदाजे ५९ लाख मिळाले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम विजेत्या संघाला अंदाजे १९.४९ कोटी दिले जाणार होते, तर उपविजेत्याला अंदाजे ९.७४ कोटी मिळणार आहे. म्हणून, जर भारताने स्पर्धा जिंकून एकूण कमाई अंदाजे २१.४ कोटी मिळाली. उपविजेत्या न्यूझीलंडला ११.४ कोटी मिळाले.