Kittur Murder : लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाचा दगड, विटाने वडील-भावाकडून खून; मंजुनाथचं एका मुलीवर प्रेम होतं, पण..
esakal March 10, 2025 12:45 PM

खुनाची माहिती मिळाल्यानंतर कित्तूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पिराप्पा बसप्पा कुरबर (रा. चिक्कनंदीहळ्ळी) यांचा जबाब नोंदविला.

बेळगाव : लग्नाचा (Marriage) तगादा लावल्यामुळे तरुणाचा भाऊ व पित्याने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना कित्तूर तालुक्यातील (Kittur Taluka) चिक्कनंदीहळ्ळी गावात शनिवारी (ता. ८) रात्री उशिरा घडली. मंजुनाथ नागाप्पा उळ्ळागड्डी (वय २५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गुरुबसप्पा नागाप्पा उळागड्डी (२८) आणि वडील नागाप्पा गुरुबसप्पा उळ्ळगड्डी (६३) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

(Kittur Police) सांगितले की, मृत मंजुनाथ याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, घरच्यांना मुलगी पसंत नव्हती, तरी मुलाच्या हट्टापायी मंजुनाथ व त्याचा मोठा भाऊ यांचा १ वर्षापूर्वी साखरपुडा करण्यात आला. त्यानंतर थोड्या दिवसांनी मोठा मुलगा गुरुबसप्पा याचा विवाह वडील नागप्पा यांनी लावून दिला; पण दुसरा मुलगा मंजुनाथ याचे लग्न केले नाही. त्यामुळे मंजुनाथने मानसिक नैराश्येतून अधिक मद्यप्राशन करण्यास सुरू केले. त्यातून घरात सतत खटके उडत आणि वाद होऊ लागला.

शनिवारी (ता. ८) रात्री पावणेनऊच्या सुमारास मंजुनाथ पुन्हा मद्यप्राशन करून घराकडे आला. वडी-भावाशी वाद घालत लग्नासाठी तगादा लावला. शिवाय मोठ्याने आरडाओरड करू लागला. त्यामुळे रागाच्या भरात ते बाहेर आले व त्यांनी ‘मंजुनाथ याचा खूप त्रास वाढला आहे’, असे म्हणत त्याला जमिनीवर पाडले. नागाप्पाने मंजुनाथला घट्ट पकडले. गुरुबसप्पाने दगड आणि विटा आणून मंजुनाथच्या डोक्यात, चेहरा आणि तोंडावर हाणले. यात गंभीर जखमी झालेल्या मंजुनाथ याचा मृत्यू झाला.

खुनाची माहिती मिळाल्यानंतर कित्तूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पिराप्पा बसप्पा कुरबर (रा. चिक्कनंदीहळ्ळी) यांचा जबाब नोंदविला. यानुसार गुरुबसप्पा आणि नागाप्पा विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कित्तूर पोलिस पुढील तपास करत आहेत. खून प्रकरणाची नोंद झाल्यानंतर काही तासांत गुरुबसप्पा आणि नागाप्पा यांना अटक करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.