कोरेगाव : येथील आझाद चौक- नवीन बस स्थानक रस्त्यालगत एका कपडे विक्रीच्या दुकानात ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील एका २३ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून झाल्याची घटना आज घडली. या खुनाची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात सुरू होती. प्रतीक राजेंद्र गुरव ऊर्फ बाबू असे मृत युवकाचे नाव आहे.
कोरेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत हा खून करणाऱ्या संशयिताला रात्री ताब्यात घेतले असून, या खुनाचे नेमके कारण काय? खुनामध्ये आणखी कोणी समाविष्ट आहे का? याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नावे समजू शकले नसले तरी तोही ल्हासुर्णे गावचा रहिवासी असून, मृत युवकाचा तो अत्यंत घनिष्ठ मित्र आहे,
तसेच मृत प्रतीकचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा सुरू होते. यावेळी गावातील युवकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या खुनाचा तपास पोलिस निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत.