अमर घटारे
अमरावती : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. यानंतर देशभरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानुसार अमरावतीमध्ये देखील रस्त्यावर उतरत फटाके फोडून जल्लोष केला जात असताना काही टवाळखोरांनी पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या संघात स्पर्धेतील अंतिम सामना ९ मार्चला खेळविण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर चार गडी राखून विजय मिळवत १२ वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी पटकावली आहे. यामुळे देशभरात रात्रीच्या सुमारास जल्लोषाचे वातावरण होते. अनेकांनी रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा करताना फटाक्यांची आतिषबाजी केली. शहरात देखील तरुणांनी फटाके फोडत आनंद साजरा केला.
गर्दीत पोलिसांवर फेकले फटाके
भारताने चॅम्पियन करंडक जिंकल्यानंतर रात्री दहा वाजेनंतर अमरावती शहरातील राजकमल चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सगळ्यांनी एकत्र येत जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली. तर याठिकाणी काही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील आले होते. मात्र गर्दीतील काही टवाळखोरांनी पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिला चोप
दरम्यान अमरावती शहरातील राजकमल चौक येथे गर्दीत जमावातील टवाळखोरांनी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. यात सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही. मात्र पोलिसांनी फटाके फोडणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.