वाशी: लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी कटकारस्थाने रचली, न्यायालयातही गेले; पण न्यायालयानेदेखील विरोधकांना चपराक दिली. लाडक्या बहिणींनी विरोधकांना निवडणुकीत चांगलीच चपराक दिली आहे. महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ऐरोलीत दिले.
येथील साईनाथवाडी परिसरामध्ये सुनील चौगुले क्रीडांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सन्मान लाडक्या बहिणींचा या विशेष कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद साधताना रविवारी (ता. ९) त्यांनी हे आश्वासन दिले. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, कार्यक्रमांचे आयोजित साहिल चौगुले, माजी नगरसेवक ममित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिलासाठी वाद्यवृदांचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला होता. लाडक्या बहिणीसाठी अभिनेत्रीसोबत गप्पा-गोष्टी, खेळ, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी लाडक्या सन्मान करत असताना उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सरकारकडून मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करून स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या लाडक्या बहिणींनादेखील सन्मानित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कुणी कितीही प्रयत्न केला तरी बंद करणार नाही. आता लाडकी बहीणसाठी २,१०० रुपयांची मागणी पुढे आली असून, योग्य वेळी ही मागणीदेखील पूर्ण केली जाईल.