पुणे - रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण तुटल्याच्या कारणावरून सात ते आठजणांनी एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यास लाथाबुक्क्यांनी आणि हत्याराने मारहाण केली. ही घटना विमाननगर परिसरातील फॉरेस्ट पार्क येथे रविवारी दुपारी घडली.
या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गोरखनाथ एकनाथ शिर्के (वय ६५, रा. फॉरेस्ट पार्क, विमाननगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद हनुमंत कॅनल, मयूर सकट (रा. येरवडा), राजू देवकर यांच्यासह येरवडा येथील अन्य पाच जणांविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्के हे बंडगार्डन, चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते २०१८ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू केले होते. फॉरेस्ट पार्कमधील सार्वजनिक रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण तुटले होते.
कॅनल याने शिर्के यांच्याकडे येणाऱ्या बांधकाम साहित्याच्या वाहनांमुळे ड्रेनेजचे झाकण तुटल्याचे सांगत ते दुरुस्त करण्यास सांगितले. त्यावर शिर्के यांनी ते दुरुस्त करून देत असल्याचे सांगितले. परंतु त्यावेळी झालेल्या किरकोळ वादातून आरोपींनी शिर्के यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी हत्याराने मारहाण केली.
तसेच, जीवे मारण्याची धमकी देत घराच्या पार्किंगमधील खुर्च्या आणि कुंड्यांची तोडफोड केली. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.