मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे राज्यात वादाला सुरुवात झालीये. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी महाकुंभातील पाण्याच्या दर्जावरुन पाणी प्यायला स्पष्ट नकार दिल्याचं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी अगदी नक्कल करत महाकुंभातील पाणी आणि तिथे होणाऱ्या स्नानावर परखड पण विनोदी शैलीत ताशेऱे ओढल्यानं राज ठाकरेंच्या हिंदुत्त्वाचे आता परिक्षण व्हायला सुरुवात झालीये. या सगळ्या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली राज ठाकरेंनी असं काय म्हटलं ते पाहुया..
144 वर्षांनी देशात महाकुंभ पार पडला. यामहाकुभांसाठी हजारो कोटींचा खर्च झाला. योगी सरकारनं या महाकुंभाचं व्यवस्थापन पार पाडलं. अगदी 50-60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केलं. पण याच महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केल्यानं वाद सुरु झालाय. राज ठाकरेंनी थेट हिंदुत्त्वाचा अपमान केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
राज ठाकरेंच्या यावक्तव्यावरुन मनसे आणि भाजप नेते नितेश राणेंनी सडकून टिका केलीये. तर संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन भाजपाला टोला हाणलाय.
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि कॉग्रेंस सोबत जाऊन शिवसेनेचा पुरोगामी विचार मांडला. हीच संधी साधून राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्त्ववादाची मांडणी करत आपल्या पक्षाचा झेंडाच बदलला. भविष्यात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मनसे आणि भाजप युतीची शक्यता दिसत होती. मात्र लोकसभेत पाठिंबा देऊनही विधानसभेत सुपडासाफ झाल्यानं राज ठाकरेंनी महाकुंभाच्या आडून युपीतील योगींच्या व्यवस्थापनावरच सवाल उपस्थित केले आहेत.त्यामुळे भाजप सोबत मनसेची दरी आणखीन रुंदावली असं दिसतंय. येत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाचा समाचार घेतात की बंधूप्रेमाची गुढी उभारतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.