तुमचा वीज पुरवठा बंद करु, 15 लाख घरं अंधारात…, ट्रम्प यांना त्यांच्या स्टाईलनं कॅनडाचा इशारा
Marathi March 11, 2025 10:24 AM

कॅनडा यूएस ट्रेड वॉर न्यूयॉर्कः अमेरिकेचे अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमकपणे वाटचाल सुरु केली. ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांना पहिल्यांदा टार्गेट करत त्यांच्यावर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. याशिवाय भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावू असं ट्रम्प म्हणाले. कॅनडा आणि मेक्सिकोवर आयात शुल्क लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला त्या देशांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयानंतर व्यापारी तणाव वाढला आहे. कॅनडातील ओंटारियो प्रांतानं अमेरिकेला निर्यात होत असलेल्या वीजेवर 25 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ओंटारिओतून न्यूयॉर्क,मिनेसोटा आणि मिशिगनमध्ये 15 लाख अमेरिकन ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. ओंटारिओचे प्रीमियर डग फोर्ड यांनी स्पष्ट केलं की अमेरिकेनं टॅरिफ वाढवले तर अमेरिकेला होत असलेला वीज पुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल.

डग फोर्ड म्हणाले जर अमेरिका टॅरिफ वाढवणार असेल तर मी वीज पुरवठा बंद करण्यास मागं पुढं पाहणार नाही. फोर्ड म्हणाले ते की त्यांना अमेरिकेच्या नागरिकांबाबत सहानूभुती वाटते, कारण व्यापार युद्ध त्यांनी सुरु केलेलं नाही. त्यासाठी केवळ एक व्यक्ती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत.

अमेरिकेला होणाऱ्या वीज पुरवठ्यावर 25 टक्के शुल्क आकारल्यानं ओंटिरिओच्या सरकारला 2 लाख 8 हजार ते 2 लाख 77 हजार अमेरिकन डॉलरचा अतिरिक्त महसूल मिळेल. हा पैसा ओंटारियोच्या कामगार, नागरिक आणि व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरला जाईल. ओंटारिओनं वीज पुरवठ्यावर 25 टक्के शुल्क आकारालं आहे तर कॅनडानं अमेरिकेवर 21 टक्के शुल्क आकारलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि  मेक्सिकोवर  25 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तर, चीनवर 10 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. यामुळं महागाई वाढणे याशिवाय आर्थिक मंदीचं सावट वाढलं होतं. कॅनडा, मेक्सिको आणि चीननं देखील अमेरिकेवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली.

डग फोर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ मागं घेण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत ते टॅरिफ मागं घेणार नाहीत तोपर्यंत ओंटारिओ देखील शुल्क रद्द करणार नाही. मी अमेरिकन लोकांना अधिक त्रास देण्यासाठी काहीही करेन, कारण डोनाल्ड ट्रम्प दर दिवशी भूमिका बदलतात आणि कॅनडावर हल्ला करतात.

अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या व्यापार तणावामुळं दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. ओंटारिओचा वीज पुरवठ्यावर 25 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांना जोरदार उत्तर मानलं जातं आहे. हा वाद वाढल्यास अमेरिका आणि कॅनडाचे संबंध बिघडतील.

इतर बातम्या :

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मैत्री केली पण महागात पडली, एलन मस्कवर लोक नाराज, तब्बल 9 लाख कोटी बुडाले

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.