WPL 2025 Play-offs: दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये! प्लेऑफचं चित्र स्पष्ट, जाणून घ्या कोणाचा सामना कोणाविरुद्ध
esakal March 12, 2025 08:45 AM

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात मंगळवारी पार पडला. या सामन्यात बंगळुरूने ११ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे पाँइंट्स टेबलवरील पाचही संघांचे स्थान निश्चित झाले असून प्लेऑफच्या लढतींचे चित्रही स्पष्ट झाले.

बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून मुंबईला अव्वल क्रमांकावर थेट अंतिम सामना गाठण्याची संधी होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वूमन्स प्रीमियर लीगमध्ये पाच संघांमध्ये साखळी फेरीनंतर जो संघ अव्वल स्थान पाँइंट्स टेबलमध्ये मिळवतो, तो संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतो. या नियमानुसार दिल्ली कॅपिटल्स थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहे.

८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सनेही ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे १० गुण आहेत. परंतु दिल्लीचा नेट रनरेट (+०.३९६) मुंबईपेक्षा (+०.१९२) चांगला आहे. त्यामुळे दिल्ली अव्वल क्रमांकावर राहिले.

दिल्लीने तिन्ही हंगामात अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याचा कारनामा केला आहे. पहिल्या दोन्ही हंगामात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता पहिले विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

दरम्यान, पाँइंट्स टेबलमध्ये गुजरात जायंट्स ८ सामन्यांपैकी ४ विजयांसह ८ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे ते देखील प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. पण आता त्यांना एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे.

कारण अंतिम सामन्यातील दुसरा संघ ठवण्यासाठी पाँइंट्स टेबलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ एकमेकांविरुद्ध एलिमिनेटर खेळतात. या सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचेल आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजेतेपदासाठी खेळेल.

एलिमिनेटरचा सामना गुरुवारी (१३ मार्च) होणार आहे. तसेच अंतिम सामना शनिवारी (१५ मार्च) होणार आहे. हे दोन्ही सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ८ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले. त्यामुळे ६ गुण मिळवत त्यांनी चौथा क्रमांकावर स्पर्धा संपवली. तसेच युपी वॉरियर्स या पाँइंट्सटेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिले. त्यांनीही ८ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले. त्यामुळे त्यांचेही ६ गुण आहेत. पण बंगळुरूचा नेट रन रेट त्यांच्यापेक्षा चांगला आहे.

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ प्लेऑफ - एलिमिनेटर -
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई (वेळ - संध्या. ७.३० वा.)

अंतिम सामना
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एलिमिनेटरमधील विजेता संघ, मुंबई, (वेळ - संध्या. ७.३० वा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.