मुंबई - पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकावर एका तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानक प्रमुख सुनील मेळे व मोहिनी ढगे या चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली.
तसेच, यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मंत्री सरनाईक म्हणाले, ‘२५ फेब्रुवारी रोजी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन या बसस्थानकावर त्या वेळी कर्तव्यावर असलेले स्थानकप्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी.
त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले होते. तसेच या बस स्थानकावरील सर्व २२ सुरक्षारक्षक तत्काळ बदलून त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षारक्षकांना नेमण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपरोक्त कारवाई करण्यात आली आहे.’