Ukraine Russia War : मोठी बातमी! युक्रेन रशियासोबत 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमत; अमेरिका मदतीवरील बंदी उठवणार
esakal March 12, 2025 01:45 PM

आता सर्वांच्या नजरा रशियावर आहेत. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ पुढील काही दिवसांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची अपेक्षा आहे, जिथे ते युद्धबंदीचा प्रस्ताव सादर करतील.

Ukraine Russia War : युक्रेनने काल (मंगळवार) अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या तात्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला मान्यता देण्याची घोषणा केलीये. याशिवाय, रशियासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने चर्चा सुरू करण्यावरही सहमती दर्शवलीये. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये नऊ तासांहून अधिक काळ झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

या कराराअंतर्गत, अमेरिकेने युक्रेनसोबत लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती शेअर करण्यावरील बंदी तात्काळ उठवण्याची घोषणा केली आहे. "युक्रेन शांततेसाठी तयार आहे. आम्ही या प्रस्तावाचे स्वागत करतो आणि तो सकारात्मक मानतो," असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्या कार्यालयाचे प्रमुख आंद्रेई येरमाक (Andriy Yermak) यांनी सांगितले.

रशियानेही आपल्या अटींचे पालन करण्यास सहमती दर्शविली, तरच ही युद्धबंदी प्रभावी होईल, असेही त्यांनी सांगितले. " आता रशियाला यावर सहमत होण्यासाठी राजी करावे लागेल. आम्हाला आशा आहे की, हे निष्पक्ष आणि चिरस्थायी शांततेच्या दिशेने पहिले पाऊल असेल," असेही झेलेन्स्की यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो (Marco Rubio) हे चर्चेचे नेतृत्व करत होते. ते म्हणाले, "आता हा चेंडू रशियाच्या कोर्टात आहे. आम्ही हा प्रस्ताव रशियाला कळवू आणि आशा करतो की, ते शांततेला 'हो' म्हणतील." रुबियो पुढे म्हणाले, जर रशियाने हा प्रस्ताव स्वीकारला तर पुढील टप्पा दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सविस्तर वाटाघाटींचा असेल.

यासोबतच, अमेरिका आणि युक्रेनने युक्रेनच्या महत्त्वाच्या खनिज संसाधनांच्या विकासासाठी एक व्यापक करार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे मान्य केले आहे, जो ट्रम्प प्रशासन युक्रेनच्या दीर्घकालीन समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मानतो. खनिज कराराची चर्चा यापूर्वीही सुरू होती, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील तणावामुळे अलीकडेच तो स्थगित करण्यात आला.

युद्धबंदीच्या अटी आणि पुढील पावले

संयुक्त निवेदनानुसार, ही 30 दिवसांची युद्धबंदी परस्पर संमतीने वाढवली जाऊ शकते आणि ती रशियाच्या मान्यतेनुसार आणि एकाच वेळी अंमलबजावणीच्या अधीन आहे. रशियानेही असेच केल्यास, हवाई, समुद्री आणि जमिनीवरील हल्ल्यांसह सर्व लष्करी हालचाली थांबवण्यास युक्रेन तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री त्सिबिहा यांनी याला "शांततेच्या दिशेने एक गंभीर पाऊल" म्हटले आणि ते दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करेल, असेही ते म्हणाले.

आता सर्वांच्या नजरा रशियावर आहेत. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ पुढील काही दिवसांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची अपेक्षा आहे, जिथे ते युद्धबंदीचा प्रस्ताव सादर करतील. तथापि, रशियाने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने यापूर्वी म्हटले होते, की रशिया शांततेसाठी तयार आहे. परंतु, ते त्याच्या अटींवर अवलंबून असेल.

दरम्यान, जेद्दाह चर्चेच्या काही तास आधी युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये तीन लोक ठार झाले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी 337 युक्रेनियन ड्रोन पाडले. हा हल्ला कदाचित रशियावर दबाव आणण्याच्या रणनीतीचा एक भाग असावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.