Kidney Disease Remedies: किडनी आजार बरे होऊ शकतात का? आधुनिक वैद्यकीय प्रगतीचा शोध
esakal March 12, 2025 08:45 PM

How Effective Are Modern Medical Treatments On Kidney Diseases: किडनी हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून रक्त शुद्ध करणे, विषारी पदार्थ बाहेर टाकणे, शरीरातील द्रव संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे यांसारखी महत्त्वाची कार्ये ती करते. मात्र, अयोग्य जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि काही अनुवंशिक कारणांमुळे किडनीचे कार्य बिघडू शकते. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो – किडनीचे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात का? आधुनिक वैद्यकीय उपचार कितपत प्रभावी आहेत?

किडनीचे आजार – कारणे आणि स्वरूप

किडनीचे आजार प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात

- अक्यूट किडनी इंज्युरी (AKI)

- क्रोनिक किडनी डिसीज (CKD)

अक्यूट किडनी इंज्युरी (AKI)

ही एक तात्पुरती समस्या असते आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास किडनीचे कार्य पूर्ववत होऊ शकते. हे प्रामुख्याने डिहायड्रेशन, गंभीर संसर्ग, काही विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम किंवा मूत्र मार्गाच्या अडथळ्यांमुळे होऊ शकते.

क्रोनिक किडनी डिसीज (CKD)

हा आजार दीर्घकाळ टिकतो आणि हळूहळू किडनीचे कार्य कमी होत जाते. मुख्य कारणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, वारंवार होणारे मूत्र मार्गाचे संसर्ग, मूत्राशयातील खडे आणि काही अनुवांशिक विकार यांचा समावेश होतो. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे सौम्य असतात, पण अंतिम टप्प्यावर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण यांची गरज भासते.

आधुनिक वैद्यकीय उपचार आणि प्रगती

किडनी आजारांवर आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने अनेक नवीन उपचारपद्धती विकसित केल्या आहेत.

१. अचूक निदानासाठी प्रगत चाचण्या

पूर्वी केवळ लक्षणांवर आधारित निदान केले जात असे, पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीने किडनीच्या कार्यक्षमतेचे अचूक मोजमाप करता येते.

• ब्लड टेस्ट (क्रिएटिनिन आणि GFR चाचणी) – किडनीची कार्यक्षमता तपासते.

• यूरिन टेस्ट – प्रथिने (प्रोटीन), रक्त किंवा संसर्ग आहे का, हे शोधते.

• अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन – किडनीमध्ये काही अडथळे किंवा गाठी आहेत का, याचा शोध घेते.

• बायोप्सी – किडनीच्या ऊतींचे विश्लेषण करून आजाराचे कारण समजते.

२. औषधोपचार आणि आहार व्यवस्थापन

क्रोनिक किडनी डिसीजच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य औषधे आणि आहार नियंत्रणामुळे आजाराचा वेग कमी करता येतो.

• रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे

• काही विशिष्ट मूत्रवर्धक औषधे (Diuretics)

• प्रथिनांचे मर्यादित सेवन आणि लो-सोडियम आहार

• अन्नातील पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण संतुलित ठेवणे

३. डायलिसिस – किडनी फेल झाल्यावर जीवनरक्षक उपाय

जेव्हा किडनी ९०% पेक्षा जास्त निकामी होते, तेव्हा डायलिसिस हा महत्त्वाचा उपाय असतो.

• हीमोडायलिसिस – मशीनच्या मदतीने रक्त शुद्ध केले जाते.

• पेरिटोनियल डायलिसिस – पोटातील पडद्याद्वारे रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया.

४. किडनी प्रत्यारोपण – कायमस्वरूपी उपाय

जेव्हा किडनीचे कार्य पूर्णतः बंद होते, तेव्हा किडनी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम उपाय ठरतो.

बायो-इंजिनीअर्ड किडनी यांसारख्या तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे. भविष्यात हे उपचार आणखी प्रभावी होतील.

किडनी आजार टाळण्यासाठी योग्य सवयी

किडनीचे आरोग्य जपण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे आहेत

• पुरेसा पाणी प्या (८-१० ग्लास दररोज)

• मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा

• संतुलित आहार घ्या – कमी मीठ, कमी साखर आणि भरपूर ताज्या भाज्या-फळे खा

• दारू, धूम्रपान आणि तंबाखू सेवन टाळा

• शारीरिक सक्रियता वाढवा – दररोज व्यायाम करा

• नियमित आरोग्य तपासणी करून घ्या

किडनीचे आजार पूर्णतः बरे होतील का, हे त्या आजाराच्या स्वरूपावर अवलंबून असते. अक्यूट किडनी इंज्युरी योग्य वेळी उपचार घेतल्यास बरी होऊ शकते, पण क्रोनिक किडनी आजाराचा पूर्णतः इलाज नसला तरीही योग्य व्यवस्थापन केल्यास त्याचा वेग कमी करता येतो. आधुनिक उपचारांमुळे किडनीचे आरोग्य सुधारता येते आणि भविष्यात आणखी नवे पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे वेळेत निदान, उपचार आणि योग्य जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे.

- डॉ. सौरभ खिस्ते

सल्लागार - नेफ्रोलॉजी

मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.