नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर श्वान आल्याने एक विमान भोपाळकडे वळवावे लागले. धावपट्टीवरील श्वानामुळे विमान उतरविताना अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.
इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ५२४३ हे विमान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १०.५५ वाजता मुंबईहून नागपूरला निघाले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवित असताना धावपट्टीवर श्वान वा श्वानसदृश प्राणी असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. विमान उतरविताना श्वानामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता वैमानिकाने रात्री १२.३० ते १ वाजतादरम्यान विमान भोपाळकडे वळविले. दरम्यान, नागपूर विमानतळावरील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
श्वान वा इतर कुठल्याही प्राण्यामुळे विमान उतरविताना अडथळा येणार नाही, याची निश्चिती करण्यात आली. त्यानंतर रात्री २.३० वाजता विमान नागपूर येथे परतले. या प्रकारामुळे निर्धारित वेळापत्रकानुसार रात्री १२.३५ वाजता नागपूर येथे पोहचणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल तीन तास उशिरा विमान नागपुरात उतरले.