वारकऱ्यांच्या गर्दीने फुलली देहूनगरी
esakal March 14, 2025 10:45 PM

देहू, ता. १४ : संत श्री तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (ता. १६) होणाऱ्या तुकाराम बिजेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक देहूत दाखल होऊ लागले आहेत. यंदा होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत आणि देहू संस्थानने जय्यत तयारी केली आहे. देहूत विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे.

देहू परिसरात विविध गावात बीज सोहळ्यानिमित्त अनेक दिंडीकरी यांचे अखंड हरिनाम सप्ताह सोहळे सुरू आहेत. त्यामुळे बीज सोहळ्याला वारकऱ्यांची संख्या वाढणार आहे. या बाबत संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, ‘‘या बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे येतात. भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी संस्थानने तयारी केली आहे. पिण्याचे पाणी आणि आरोग्याच्यादृष्टीने संस्थानने काळजी घेतली आहे. यंदा पहिल्यांदाच वैकुंठस्थान येथे भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे भाविकांचा उन्हापासून बचाव होईल. यावेळी संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे व इतर उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज महाराज बीज सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, हवेलीचे प्रांताधिकारी डॅा. यशवंत माने, पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, देहूनगर पंचायतच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी गुरुवारी (ता. १३) संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी माने यांनी सूचना दिल्या.

देवस्थानची तयारी
- मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान मंदिराला रंगरंगोटी
- देऊळवाड्यावर विद्युत रोषणाई
- देऊळवाड्यासमोर भव्य मंडप उभारला
- देऊळवाडा, वैकुंठस्थान येथे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले
- विविध दिंडीकरी, मानकरी यांना पत्रव्यवहार केला
- इंद्रायणी घाट परिसराची स्वच्छता
- मुख्य देऊळवाडा परिसरात स्वच्छतेसाठी तीस कर्मचारी नियुक्त
- वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत पाणी सोडण्याची पाटबंधारे विभागाला मागणी
- सुमारे चार हजार गाथा विक्रीसाठी उपलब्ध

प्रशासनाची तयारी
- भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी चोवीस तास पाणी पुरवठा सुरू
- दहा टॅंकर विविध ठिकाणी उपलब्ध करून देणार
- नगरपंचायत कार्यालयात कंट्रोलरूम उभारणार
- आरोग्य विभागाच्या वतीने पाच ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू
- उन्हाळा असल्याने ओआरएसची सोय
- आठ रुग्णवाहिका उपलब्ध
- पीएमपीएलने गावाबाहेर वाहनतळ केले असून पुणे ते देहू,देहू ते स्वारगेट,देहू ते आळंदी या भागाकरिता जादा बसेसची सोय
- देहूरोड पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त
- देहू गावामध्ये शनिवार (ता. १५) व रविवारी (ता. १६) या दोन दिवशी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार

असा असेल बीज सोहळा
- पहाटे ३ वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडआरती
- पहाटे ४ : ‘श्री’ पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ, वंशज, वारकरी यांच्याहस्ते.
- पहाटे ४.३० :विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा.
- सकाळी ६ : वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
- सकाळी १० : पालखी प्रस्थान वैकुंठस्थान मंदिराकडे
- सकाळी १० ते दुपारी १२ ः वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर
महाराजांचे कीर्तन
- दुपारी १२.३० : वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन
- रात्री : पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तनाचे कार्यक्रम

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.