उरुळी कांचन, ता. १४ : घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडर टाक्यांमधून नोझलच्या साह्याने गॅस इतर खासगी टाक्यांमध्ये भरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एकाला मदन माधव बामणे (वय २०, रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर (ता. हवेली) याला लोणी काळभोर पोलिस व पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २४ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना माहिती मिळाली की, लोणी काळभोर येथील साईसृष्टी बिल्डींग मागील एका गोठ्यामध्ये एक जण घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरमधील गॅस काढून तो इतर खासगी कंपनीच्या टाक्यांमध्ये भरून काळ्या बाजाराने विकतो. त्यानुसार या ठिकाणी गुन्हे शाखा व लोणी काळभोर पोलिसांनी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी (ता. १२) दुपारी दीड वाजता छापा टाकला. त्यामध्ये त्यांना मदन बामणे हा गोदामामध्ये घरगुती गॅस सिलिंडर, तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरमधील गॅस नोझलच्या सहाय्याने काढून लहान मोठ्या गॅस सिलिंडरमध्ये धोकादायकरीत्या भरत असल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण २ लाख २४ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ६चे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार रामहरी वणवे, कानिफनाथ कारखेले, प्रदीप क्षीरसागर, पोलिस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन मुंडे, अक्षय कटके, सचिन सोनवणे, प्रतीक्षा पानसरे, बालाजी बांगर व हवेलीचे पुरवठा निरीक्षक इम्रान मुलाणी यांच्या पथकाने केली.
या कारवाईत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ११ व्यावसायिक वापराच्या टाक्या (३१ हजार ९०० रुपये), इंडेन कंपनीच्या घरगुती वापराच्या ७ गॅस टाक्या (१७ हजार १५० रुपये), पुष्पा कंपनीच्या घरगुती वापराच्या ९ रिकाम्या टाक्या (१३ हजार रुपये), हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या २१ टाक्या (५१ हजार ४५० रुपये), हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या घरगुती वापराच्या रिकाम्या २१ गॅस टाक्या (१९ हजार ४५० रुपये), रिलायन्स कंपनीच्या ६ घरगुती वापराच्या गॅस टाक्या (१४ हजार ७०० रुपये), हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या 2 लहान गॅस टाक्या (३ हजार ५०० रुपये), स्थानिक कंपनीच्या ८६ लहान-मोठ्या गॅस टाक्या (८६ हजार रुपये), गॅस ट्रान्स्फर करण्याचे लोखंडी ५ नोझल (५०० रुपये), एक पितळी नोझल (२०० रुपये), रेग्युलेटर पाइप (२ हजार रुपये), इलेक्ट्रीक वजनकाटा (३५०० रुपये) आदी जप्त केले.