राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. अभिनेत्यांसह क्रिकेटपटूंनीही मोठ्या उत्साहात एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा टी 20i कर्णधार सूर्यकुमार यादव रंगपंचमीच्या मुहुर्तावर शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन झाला. सूर्यकुमारने शिर्डीत सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मंदिर समितीकडून सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी या दोघांचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. सूर्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूर्या टी 20i संघाचा भाग असल्याने तो ऑफ फिल्ड आहे. मात्र सूर्या आता लवकरच आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळताना दिसणार आहे.
संदिर समितीने पोस्ट केलेल्या व्हीडिओत सूर्या आणि देवीशा शेट्टी दोघेही साईबाबाचं दर्शन घेत आहे. दोघांनी यादरम्यान पूजा केली. तसेच दोघांनी मंदीर परिसरात अनेकांच्या भेटी घेतल्या. सूर्या आणि देवीशा शेट्टी या दोघांना दर्शनानंतर मंदिर समितीकडून सम्मानित करण्यात आलं. सूर्याची शिर्डीत जाण्याची ही गेल्या 3 महिन्यातील ही दुसरी वेळ ठरली. सूर्याने याआधी जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेआधी साईबाबांच दर्शन घेतलं होतं.
दरम्यान आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. तर मुंबईचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. सूर्यकुमार मुंबई इंडियन्स टीममध्ये आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने सूर्याला मेगा ऑक्शनआधी करारमुक्त न करता कायम ठेवलं होतं. मुंबईने सूर्यासाठी 16 कोटी 35 लाख रुपये मोजले होते.
दरम्यान सूर्यकुमार यादव याला आयपीएलमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. सूर्याने आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघा प्रवेश मिळवला.सूर्याने आयपीएलमध्ये मुंबईकडून 6 एप्रिल 2012 रोजी पुणेविरुद्ध पदार्पण केलं होतं. सूर्याने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 150 सामने खेळले आहेत.
सूर्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक
सूर्यकुमारने या 150 पैकी 106 सामन्यांत मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने आयपीएल कारकीर्दीत 32.08 च्या सरासहीने 3 हजार 594 धावा केल्या आहेत. सूर्याने या दरम्यान 24 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली आहेत. सूर्याने या धावा 145.32 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.