प्रेम, धोका आणि ब्रेकअप असा त्रिकोण आपल्याला माहिती आहे. काहींनी अनुभवही घेतला असेल पण हे प्रकरण वेगळंच आहे. यातल्या रवींद्रला तिने म्हणजे नेहाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय पण टेन्शन अख्ख्या देशाचं वाढवलंय. हनी ट्रॅपमध्ये अडकून या भाऊने देशासाठी आगामी काळात अत्यंत महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गगनयान प्रोजेक्ट्सह इतरही महत्वाची माहिती शेअर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युपी एटीएस म्हणजे दहशत विरोधी पथकाने रवींद्र कुमार नावाच्या व्यक्तीला नुकतीच अटक केली. त्याचे कारनामे आणि मुख्य म्हणजे मूर्खपणा बघून देशाने डोक्याला हात लावला आहे. कारण त्याने अनेक महत्वाची माहिती पाकिस्तानी आयएसआय एजंटसोबत शेअर केली आहे. उत्तर प्रदेशातल्या फिरोझाबाद जवळच्या हजरतपूर इथल्या ऑर्डीनन्स फॅक्टरीत काम करतो. तिथे अनेक महत्वाच्या प्रोजेक्टसवर काम सुरु आहे. त्यात गगनयान सारख्या प्रोजेक्टचा समावेश आहे.
नेहा शर्माने असा लावला चुना !तर एका फेसबुक अकाऊंटवरून हा प्रकार सुरु झाला. या अकाउंटचे नाव आहे नेहा शर्मा. तर या अकाऊंटवरून गप्पा सुरु झाल्या. गप्पांमधून रवींद्र कुमारचा विश्वास संपादन करण्यात आला. मग नंबर एक्सेंज झाले आणि व्हॉटसपवरून तासंतास बोलणं सुरु झालं. त्या सो कॉल्ड नेहाने कामाच्या गप्पा सुरु केल्या. तिने रवींद्रच्या कामात रस दाखवायला सुरुवात केली आणि मला प्रूफ बघायचेत वगैरे लाडीक बोलून याच्याकडून कागदपत्र मागवली.
याने प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधून ती शेअरही केली. त्यात लॉजिस्टिक ड्रोन, आणि काही गोपनीय चाचण्यांचे रिझल्ट पण शेअर केले आहे. हा प्रकार जून २०२४ मध्ये जवळपास ९ महिने सुरु होता. त्याने बायकोपासून लपवण्यासाठी नंबरही वेगळ्या नावाने सेव्ह केला होता. इकडे सुरक्षा यंत्रणांना माहिती लीक होत असल्याचे कळले. त्यानंतर त्यावर काम सुरु करण्यात आले. अशावेळी कोणालाही कल्पना न देता वॉच ठेवण्यास सुरुवात झाली आणि ती व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्यावर संशय पक्का होताच त्याला ताब्यात घेण्यात आलं.
सुरुवातीला आग्रा आणि नंतर लखनौ इथे चौकशीअंती अटक करण्यात आली. सुरुवातीला त्याने आरोप नाकारत एटीएसची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण फार काळ तो तग धरू शकला नाही आणि अखेर पोपटासारखा बोलू लागला. यात त्याने काय काय बोलणं झालं आणि काय काय शेअर केलं आहे. हेही सांगितलं आहे.
आता हा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे ही केस जाणार आहे. त्यामुळे रवींद्र अडचणीत येणार आहेच, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने काय काय गोपनीय शेअर केलं आहे हे बघावं लागणार आहे. रवींद्र कुमारच्या एका चुकीमुळे आता शेकडो लोकांची मेहनत, करोडांचा खर्च आणि देशाची सुरक्षा पणाला लागली आहे.