वुमन्स प्रीमीयर लीग 2025 स्पर्धेच्या जेतेपदाचा मान मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पहिल्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत जेतेपद जिंकलं होतं. आता तिसऱ्या पर्वातही दिल्लीला पराभूत जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचं तिसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. प्रथम गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला 149 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी 150 धावांचं आव्हान मिळालं. खरं तर हे आव्हान स्पर्धेतील ट्रेंड पाहता सोपं होतं. पण दिल्ली कॅपिटल्सने झटपट विकेट गमवल्या आणि पराभवाच्या वेशीवर आले. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं. तीन वर्षात थेट अंतिम फेरी गाठणारा दिल्ली हा एकमेव संघ आहे. मात्र तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे दडपण वाढलं होतं. यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर नॅट स्कायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी 88 धावांची भागीदारी करत संघाला सावरलं. ब्रंट 30 धावा करून बाद झाली आणि त्यानंतर झटपट विकेटची रांग लागली. मात्र एका बाजूने हरमनप्रीत कौरने मोर्चा सांभाळला. तिने 44 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 66 धावा केल्या. तर तळाशी आलेल्या अमनजोत कौर आणि संस्कृती गुप्ताने काही धावा जोडल्या. त्यामुळे 149 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 141 धावा केल्या आणि सामना 8 धावांनी गमावला.
शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती आणि नॅट स्कायव्हर ब्रंट गोलंदाजीसाठी आली होती. निक्की प्रसाद स्ट्राईकला होती आणि काय होईल याची धाकधूक लागून होती. दिल्ली कॅपिटल्सच्या हाती फक्त एक विकेट होती. त्यामुळे कधी विजय इथे तर कधी तिथे असा झुकत होता. पहिल्या चेंडूवर निकीने एक धाव घेतली आणि चरणीला स्ट्राईक दिला. दुसऱ्या चेंडूवर चरणीने एक धाव घेत निक्कीला स्ट्राईक दिला. तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि मुंबईच्या पारड्यात सामना पूर्णपणे झुकला. चौथ्या चेंडूवर निक्कीने 1 धाव घेतली आणि 2 चेंडूत 11 धावा अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर चरणीने एक धाव घेतली आणि सामना मुंबईने जिंकल्यात जमा झाला. कारण एका चेंडूत 10 धावांची गरज होती आणि चमत्काराशिवाय पर्यात नव्हता. शेवटच्या चेंडूवर निक्कीने एक धाव घेतली आणि मुंबईने सामना 8 धावांनी जिंकला
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीव सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी.