सोनई : उन्हाची तीव्रता असतानाही आज शनिशिंगणापूरला दिवसभरात दोन लाखांहून अधिक भाविकांनी शनिमूर्तीचे दर्शन घेतले. नाशिक जिल्ह्यातून मढी यात्रेसाठी चाललेल्या पायी दिंड्या, पालखी व मानाच्या काठ्याने गावात भगव्या वातावरणाची मांदियाळी पाहण्यास मिळाली. आज प्रथमच गावातील सर्व प्रमुख चौकांत पोलिस यंत्रणा अलर्ट झाल्याने भाविकांना लटकूंचा त्रास कमी प्रमाणात झाला.
होळी व धुलिवंदन सणानंतर आज शनिवारी सकाळपासून दर्शनासाठी गर्दीचा ओघ होता. राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर मढी यात्रेला जाणाऱ्या दिंड्या असल्याने काही गावात वाहतूक व्यवस्थेत काही वेळ अडचण आली होती.
‘चैतन्य कानिफनाथ महाराज की जय’ व ‘नाथांच्या नावानं चांगभलं’ नामाच्या जयघोषाने सोनई रस्ता व शनिशिंगणापुर दुमदुमून गेले होते. शनैश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात सावलीकरिता मंडप व फरशीवर मॅट टाकण्यात आले होते. पिण्याचे पाणी, आरोग्य, प्रसाद व महाप्रसाद आदी सुविधा उपलब्ध केल्या होत्या.
शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुक्कामी असलेल्या भाविकांनी पहाटे साडेचार वाजता आरतीला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. आज दुपारच्या मध्यान आरतीपर्यंत दर्शनपथमध्ये गर्दी होती. सायंकाळी चारनंतर सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री उशिरापर्यंत होता.