Milind Ekbote : मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी; औरंगजेबाची कबर नष्ट करण्याच्या तयारीचा संशय
esakal March 16, 2025 04:45 PM

छत्रपती संभाजीनगर : धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना २० दिवसांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू-तुळापूर येथे मानवंदना दिल्यानंतर खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या पत्रावरून अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी १६ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान हे जिल्हाबंदीचे आदेश शुक्रवारी (ता. १४) काढले. धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान, हिंदू एकता मोर्चा, समस्त हिंदू आघाडी, शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन यांच्याकडून दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी वढू-तुळापूर येथे कार्यक्रम घेतला जातो.

यंदा २९ मार्चला छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमासाठी एकबोटे आणि त्यांच्या संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते, समर्थक जमा होणार आहेत. मानवंदना दिल्यानंतर ते खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील अहवाल सादर केला. एकबोटे यांच्यावर यापूर्वी भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याबाबत गुन्हे नोंद आहेत. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तीव्र झाल्या.

सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे; तसेच विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या पत्रावरून अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी हे आदेश काढले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.