Harshwardhan Sapkal : औरंगजेब जेवढा क्रूर, तेवढेच देवेंद्र फडणवीस सुद्धा क्रूर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच वादग्रस्त वक्तव्य
GH News March 16, 2025 05:09 PM

“औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. स्वत:चा मोठा भाऊ दाराशिकोव्ह जो संविधान, सेक्युलर विचारांचा होता, त्याचा खून केला. त्याचा नुसता खून केला नाही. त्याचं मुंडक दिल्लीमध्ये फिरवलं. स्वत:च्या लहान भावाला पागल ठरवलं. त्याच्यावर विषप्रयोग केला, त्याला मारुन टाकलं. नेहमी औरंगजेब धर्माचा आधार घेत होता. तो कधी हजला गेला नाही. औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. टीका करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

“संतोष देशमुखांसारख्या हत्या होतात, खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मराठी माणसाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी, मावळ्यांनी, अठरापगड जातीच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला आव्हान दिलं. अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरायचे. पण मराठी माणसू औरंगजेबाला घाबरला नाही” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष’

“कबरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मराठी मातीत औरंगजेबाला गाडलय. जेव्हा त्याची कबर उचलून टाका असं म्हणतात त्याचा अर्थ मराठी माणासाचा, शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. “क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हीत होतं” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘ते गेले म्हणून काँग्रेस कमजोर झाली असं नाही’

ईडीला घाबरुन जाणारे होते, ते गेलेत. आता सामान्य माणसाला घाबरवण्याच काम वेगळ्या माध्यमातून सुरु आहे. ईडीची बंदूक लावून फार मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल केलेल आहे. हा महाराष्ट्राचा दुर्देवाने एक इतिहास आहे. मात्र ते गेले म्हणून काँग्रेस कमजोर झाली असं नाही, त्यामुळे जे गेले ते गेले” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.