यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या टी 20i मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या पहिल्या टी 20i सामन्यात पाहुण्यात पाकिस्तानवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 91 धावांवर गुंडाळल्याने 92 धावांचं आव्हान मिळालं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 10.1 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.
न्यूझीलंडसाठी टीम सायफर्ट याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. टीमने 29 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 फोरसह 44 रन्स केल्या. त्यानंतर फिन अॅलन आणि टिम रॉबिन्सन या दोघांनी न्यूझीलंडला विजयी केलं. न्यूझीलंडने 59 बॉलआधीच विजयी आव्हान गाठलं. फिनने 17 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या.तर रॉबिन्सनने 15 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. पाकिस्तानकडून अबरार अहमद याने एकमेव विकेट घेतली.
त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने पाकिस्तानला 18.4 ओव्हरमध्ये 91 रन्सवर गुंडाळलं. पाकिस्तानकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दोघे आले तसेच गेले. तर इतरांना 7 पेक्षा पुढे जाता आलं नाही. न्यूझीलंडकडून जेकब डफी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कायल जेमीन्सन याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. इश सोढीने 2 विकेट्स मिळवल्या. तर झाकरी फॉल्क्स याने एकमेव विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
न्यूझीलंडचा 61 बॉलमध्ये विजय
दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना हा मंगळवारी 18 मार्च रोजी होणार आहे. हा सामना युनिव्हर्सिटी, डुनेदिन येथे होणार आहे.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टिम सेफर्ट, फिन अॅलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झाकरी फॉल्क्स, कायल जेमीसन, ईश सोधी आणि जेकब डफी.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : सलमान आघा (कर्णधार), मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, अब्दुल समद, खुशदिल शाह, जहांदाद खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अली आणि अबरार अहमद.