सुनीता विल्यम्सची गृहवापसी, अवकाशातून पृथ्वीवर परतीचा थरारक प्रवास कसा होता? पाहा प्रत्येक मिनिटाचे व्हिडीओ…
GH News March 19, 2025 11:10 AM

नासा क्रू-9 मोहिमेतील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर या सर्व अंतराळवीरांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले. या सर्व अंतराळवीरांचे कॅप्सूल फ्लोरिडा किनारपट्टीजवळील समुद्रात उतरले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

नेमकं काय घडलं?

भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर 5 जून 2024 रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले. यानंतर नासाकडून सातत्याने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर अनेक अडचणी पार केल्यानंतर आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले.

अमेरिकेच्या वेळेनुसार, हे कॅप्सूल सोमवारी मध्यरात्री १ नंतर आंतरराष्ट्रीय केंद्रापासून वेगळे झाले. यानंतर भारतीय वेळेनुसार बुधवारी पाच वाजून 57 मिनिटांनी ते कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. नऊ महिन्यांनंतर अंतराळवीरांना घेऊन परतणाऱ्या स्पेसएक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या. फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. यासाठी टॅलाहासी या लँडिंग झोनची निवड करण्यात आली होती. कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं. या लोकांना अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी 17 तास लागले.

काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क तुटला

सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग, अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे चारही अंतराळवीर 18 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघाले होते. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान 1650 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क तुटला होता. हे एक सामान्य प्रक्रिया असली, तरी प्रत्येकाच्या मनात धाकधूक होत होती. यानंतर काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला आणि सर्वांना हायसे वाटले.

पृथ्वीच्या वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या. ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होते. WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची समोरची दृश्य दिसत होती. ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर वेगवेगळ्या वेळेत पॅरेशूट्स उघडण्यात आली.

17 तासांचा प्रवास

पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडली. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला. ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते फ्लोरिडाच्या समुद्रात उतरण्यापर्यंत सुमारे 17 तास लागले.

“क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम”

ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाले. कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर पडताच अनेक डॉल्फिन मासे त्याच्या आजूबाजूला दिसले, जे अंतराळवीरांचे जणू काही स्वागतच करत होते. “क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम” अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने केली आणि अखेर तब्बल ९ महिन्यांनी सर्व अंतराळवीरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.