औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून उपराजधानीत २ गटात तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर नागपुरातील काही भागात अजूनही तणावपूर्ण शातंता आहे. तसेच काही भागात आजही कर्फ्यू कायम आहे. नागपूर शहरातील पोलिसांच्या तीन झोन अंतर्गत ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हळूहळू ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार, अशी माहिती नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली.
१५० हून शाळा बंद
नागपूर शहरातील पोलिसांच्या तीन झोन अंतर्गत ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू आजही कायम आहे. संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून, क्यूआरटीएसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तावर आहेत. नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील १५० हून अधिक शाळा आजही बंद असणार आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा मिळाल्यामुळे त्यांना आल्या पावली घराच्या दिशेनं पुन्हा जावं लागलं आहे.
समाजकंटकावर पाच गुन्हे दाखल
नागपुरात झालेल्या २ गटातील राड्यानंतर पोलिसांनी समाजकंटकावर पाच गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही तपासून आणि करून आरोपींची ओळख पटवली जात आहेत.
४६ आरोपींना अटक
नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी ३६ आरोपींना पोलिसांनी १८ मार्चला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. सहा आरोपी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. रात्री अडीच वाजता याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने आरोपींना २१ मार्चपर्यंत पीसीआर दिला आहे. या आरोपींविरोधात गणेश पेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आणखी आरोपींचा शोध आहेत.
संचारबंदीमुळे २५० कोटींचं नुकसान
नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी सुमारे २५० कोटींचा व्यापार प्रभावित झाला आहे. परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी आणि सणासुदीच्या तोंडावर व्यापार पुन्हा एकदा सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. संचार बंदीमुळे ही परिस्थिती सुधारित जरी झाली तरी पूर्व होत होण्यासाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर ही संचारबंदी बंद होऊन व्यापार सुरळीत व्हावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.