Akole Crime : अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेचे ११ छापे; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल
esakal March 19, 2025 04:45 PM

अकोले : अकोले तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात सुमारे एक लाख १३ हजार २१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अकोले तालुक्यात जुगार, मटक्यासह अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर अकोले तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आले. त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या ११ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात सात मटका अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले, तसेच चार ठिकाणच्या छाप्यात देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करताना आढळून आल्या.

अवैध दारूच्या कारवाईत हिवरगाव आंबरे येथे हॉटेल पाटीलवाडामध्ये केशव खोडके यांना ३०१० रुपयांच्या मुद्देमालासह, वीरगाव फाटा येथील हॉटेल त्रिमूर्ती उत्तम जोरवर २९०५ रुपयांच्या मुद्देमालासह, वीरगाव फाटा हॉटेल स्नेहभोजन येथे संतोष जाधव ६७२० रुपयांच्या मुद्देमालासह व घोडसरवाडी येथील टाहाकारी रोडलगत पत्र्याचे शेडमध्ये दीपक जाधव ३०१० रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आले.

मटका जुगार अड्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये हिवरगाव आंबरे येथील हॉटेल पाटीलवाडाच्या आडोशाला गोरख दुबे यास ८०० रुपयांच्या मुद्देमालासह, वीरगाव फाटा येथील हॉटेल त्रिमूर्तीच्या आडोशाला अंजन भगवत कणक १८४० रुपयांच्या मुद्देमालासह, अकोले बस स्थानकासमोर पत्र्याचे टपरीच्या आडोशाला शाकिर असिफ शेख १७१० रुपयांच्या मुद्देमालासह, शहरातील लक्ष्मी विलास हॉटेलजवळ पत्र्याचे टपरीच्या आडोशाला रवींद्र बाळासाहेब गायकवाड १६५० रुपये मुद्देमालासह अशी कारवाई करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.