नागपूर, ता. १८ ः उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू २० वर्षीय अर्चना जाधववर तात्पुरती बंदी टाकण्यात आली होती. त्यानंतर पुढील कारवाईसाठी तिला वारंवार सूचना पाठविण्यात आली, मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने तिने उत्तेजक (डोपिंग) घेतल्याचे मान्य करण्यात आले व त्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी टाकण्याचा निर्णय जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या ॲथलेटिक इंटिग्रिटी युनिटने (एआययु) घेतला. ही बंदी ७ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे.
डिसेंबर महिन्यात एका अर्ध मॅरेथॉनच्या वेळी तिची डोपिंगची चाचणी झाली होती. त्यात तिच्या नमुन्यात स्नायू बळकट करणे आणि शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी वापरले जाणारे, मात्र बंदी असलेले ओक्सान्ड्रोलोन आढळले होते. २५ फेब्रुवारी रोजी तिने ‘मला माफ करा, मी तुमच्या निर्णयाचे स्वागत करते’ असा ई-मेल तिने एआययुला पाठविला होता. यावरून तिला यापुढे कुठलीही सुनावणी नको आहे आणि निर्णय अपेक्षित आहे, असा निष्कर्ष एयआयुने काढला व त्यानुसार तिच्यावर चार वर्षांची बंदी टाकण्यात आली. तिने एआययुला ई-मेल पाठविताना आपण हे मुद्दाम केले नाही, असा उल्लेख केला नाही. ही बाब तिच्या विरोधात गेली, असेही एआययुने म्हटले आहे.
यामुळे आता तिला ‘ब’ नमुना चाचणीची तपासणी करण्याचा अधिकारही गमवावा लागला. बंदीचा कालावधी ७ जानेवारीपासून सुरू झाला असला तरी चाचणी १५ डिसेंबर रोजी घेण्यात आल्याने त्या दिवसाचे आणि त्या पुढील तिचे सर्व निकाल अपात्र ठरविण्यात आले आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये दिल्ली मॅरेथॉनमध्ये तिने एक तास २० मिनीटे २१ सेकंदात चौथे स्थान मिळविले होते. १० हजार मीटर शर्यतीत ३५ मिनिटे ४४.२६ सेकंद, तर तीन हजार मीटर शर्यतीत १० मिनिटे २८.८२ सेकंद ही तिची सर्वोत्तम वेळ आहे. डिसेंबर महिन्यात वसई मॅरेथॉनमध्ये तिने चौथे स्थान मिळविले होते. ती कांदिवली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर सराव करीत असे.
कोण आहे अर्चनाअर्चना ही मूळची जालना जिल्ह्यातील असून, कामाच्या शोधात तिचे आई-वडील वसई (जि. पालघर) येथे स्थायिक झाले. तिचे वडील बांधकाम मजूर आहेत, तर आई घरकाम करते. अर्चनाने गेल्या वर्षी नागपुरात झालेल्या सीनियर राज्य स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीही तिची निवड झाली होती, मात्र डोपिंगमध्ये सापडल्याने तिचे नाव काढण्यात आले होते.