डॉ. प्रकाश जंगले समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
मुलुंड, ता. १९ (बातमीदार) ः प्राध्यापक कवी व गीतकार डॉ. प्रकाश जंगले यांना समाजभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. विद्या प्रसारक मंडळाच्या बेडेकर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. जंगले यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. समर्थ फाउंडेशन आणि एज्यूरिक हब यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगाव येथे रविवारी (ता. १६) पार पडला. या वेळी महाराष्ट्रातील अनेक भागातून सामाजिक शैक्षणिक, ग्रामीण विभागात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. प्रकाश जंगले यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. प्रकाश हरताळकर, माजी न्यायाधीश मुंबई तसेच वरिष्ठ वकील ॲड. कैसर अन्सारी, डॉ. दीपक साबळे, ॲड. सुनीता साबळे उपस्थित होते.