अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) ः सध्या अपघातांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी आपली गस्त वाढविली आहे. त्याचप्रमाणे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात वर्षभरात तब्बल एक लाख ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांवर रायगड वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून जवळपास १० कोटी ८५ लाख ९४ हजार ३५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेशिस्त वाहन चालविल्याने रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवून गर्दीच्या ठिकाणी वेगाने गाडी चालविणे, विनापरवाना, विनाहेल्मेट, मद्यपान करून वाहन चालविणे, अल्पवयीन चालक, अवैध पार्किंग अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वर्षभरात नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत एक कोटी ३४ लाख ८५ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे, तर नऊ कोटी ५१ लाख पाच हजार १५० रुपयांची वसुली अद्याप झालेली नाही.
वाहतूक नियम पाळणे गरजेचे
रस्त्यावर बहुतांश वाहनचालक वाहतुकीचे नियम पळत नाहीत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न बांधणे, राँग साइडने जाणे, हेल्मेट न वापरणे असे दृश्य शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाहायला मिळत आहे. हे नियम न पाळल्यामुळे जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होऊन काहींचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत.
सध्या जिल्ह्यात वाहतूक विभागाने वाहनचालाकांना शिस्त लागावी म्हणून बेशिस्त व बेदरकार गाडी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर धूम स्टाइलने स्टंटबाजीसह हेल्मेटचा वापर न करणाऱ्या चालकांनाही कारवाईला सामोर जावे लागत आहे.
- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड