बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या तुरुंगात आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसलेने वन विभागावर आरोप करत सांगितले की, 'वनविभागाने आम्हाला रस्त्यावरती आणलं. संसार उपयोगी साहित्य नाही तर आमची लेकरं रस्त्यावरती आली. राहायला घर नाही.' बावी येथील ढाकणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अटक का होत नाही?, असा सवाल सतीशच्या बायकोने केला आहे. ढाकणे पिता-पुत्रांना अटक करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याने पोलिस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याची पत्नी, बहीण आणि काही नातेवाईकांनी आमरण उपोषणांमध्ये सहभाग घेतला आहे.
'आमचं अज्ञात लोकांकडून घर जाळण्यात आलं. त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर बावी येथील ढाकणे पिता पुत्रांनी आम्हाला चुकीची वागणूक देऊन आम्हाला मारहाण केली. त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे मात्र त्यांना तात्काळ अटक करावी, त्याचबरोबर वनविभागाने अति घाई करून आमचं घर पाडलं. आम्हाला रस्त्यावरती आणलं. आमची लेकरं रस्त्यावरती आली. आम्हाला न्याय मिळावा.' अशी मागणी उपोषणाला बसलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या बायकोने केली आहे.