भिवंडी, ता. २० (वार्ताहर)ः मुस्लिमबहुल शहर असलेल्या भिवंडी शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुस्लिमबांधव ईद साजरी करताना घरी येणाऱ्यांच्या पाहुणचारासाठी खास गोड शेवया शिरखुर्मा बनवला जातो. त्यामुळे रमजानमध्ये शेवयांना विशेष महत्त्व असल्याने बाजारपेठेतही खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
रमजाननिमित्त मुस्लिम समाजातील नागरिक या काळात महिनाभराचा उपवास करतात. रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा तयार केला जातो. याच शिरखुर्माच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शिरखुर्मा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दुकानदारांना काही प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवावा लागत आहे. कोरोनानंतर सर्व सुरू झाले असले तरी महागाईमुळे सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येणारे तेल, तूप, बेदाणे, काजू, बदाम, शेवया, जायफळ, दूध, खवा या पदार्थांच्या किमतीदेखील अवाच्या सव्वा वाढल्या आहेत. त्यामुळे जवळपास ३० ते ४० टक्के ग्राहकांची संख्या रोडवल्याचे व्यावसायिक सांगतात.
---------------------------------------------------------
शेवयांचे सध्याचे भाव
कच्च्या मालाचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामध्ये तेल, तूप, मैदा यांचे भाव वाढलेले असताना बाजारपेठेत शेवयाचे विविध प्रकार आले आहेत. त्यात बनारशी भाजलेली शेवया १६० रुपये किलो आहे, तर फेणी शेवया २४० रुपये किलो असून, सुतफेणी शेवया १६० रुपये किलो आहे, तर लड्डू शेवया १६० रुपये किलो असल्याची माहिती विक्रेते शहबाज शेख यांनी दिली.
---------------------------------------------------------
विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
भिवंडी शहरात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भिवंडी शहरातील तीनबत्ती, निजामपुरा, शांतीनगर, दिवानशाह, नागाव रोड, जुना ठाणा रोड या परिसरात रमजान निमित्त नवे कपडे, चप्पल खरेदीसाठी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवकांची गर्दी होत आहे. कुटुंबासह खरेदीसाठी येणाऱ्याची संख्या अधिक असल्याने रात्री उशीरापर्यंत बाजारपेठांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र आहे.