- डॉ. मालविका तांबे
सध्याच्या काळात लोकांचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेच जण निरोगी जीवनशैली पाळण्याचा प्रयत्न करत आहेत. निरोगी जीवनशैलीत सगळ्यांत महत्त्वाचा व मोठा बदल आलेला आहे तो म्हणजे व्यायामासाठी जिमला नियमित जाणे. टीनएजर मुलगा वा मुलगी, ऑफिसला जाणारे, लोक तर जिममध्ये जातातच, पण सध्या गेट टू गेदर पण जिममध्ये करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
जिम करणे हा शारीरिक व्यायामाचा प्रकार आहे. व्यायामाचे सगळे फायदे आपल्याला जिम करण्याने मिळतात. आयुर्वेदानुसार कुठल्याही प्रकारचा उचित व्यायाम प्रकार शरीरात लघुता आणतो, कर्म करण्याचे शरीरात सामर्थ्य आणतो, शरीरातील अग्नी प्रदीप्त करतो, शरीरातील मेद अर्थात वजन कमी करायला मदत करतो. पण व्यायामाचे बरेच नियम आपल्याकडे सांगितलेले आहेत.
हे नियम अर्थातच जिम करणाऱ्यांनाही लागू होतात. त्यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक आपल्या आयुष्यात व्यायामाला स्थान दिले पाहिजे, जेणेकरून व्यायामाचे आरोग्यदायी परिणाम मिळतील पण व्यायामाचा कुठलाही दुष्परिणाम आरोग्यावर जाणवणार नाही. आज सुरू झालेल्या जिम कल्चरमध्ये आपण कुठे बसतो आहे, त्याचे काय मापदंड आहेत हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करू या.
सीमा ओळखणे
कुठलाही व्यायाम करत असताना आपण तो व्यायाम कधी सुरू केला आहे, किती दिवस हा व्यायाम करतो आहोत, आपल्या शरीराची शक्ती किती आहे, आपण व्यायामाला किती वेळ द्यायला हवा या सगळ्यांची सीमा ओळखणे आवश्यक असते. जसे रबर एका निश्र्चित ताणानंतर तुटते तसे कधी तरी ही सीमा पार केली गेल्यास त्याचे दुष्परिणाम होताना दिसतात.
कुठलाही व्यायाम ‘अर्धशक्ती’ करावा असे आयुर्वेदाचे मत आहे. अर्धशक्ती अर्थात व्यायाम केल्यानंतर दैनंदिन कामे करण्यासाठी ताकद व उत्साह टिकून राहणे. दमून जाईपर्यंत जिम केले पाहिजे असा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. काही जण तर एक-दोन तास जिममध्ये घालवतात हे उचित नाही. पण प्रत्येकाची शारीरिक शक्ती सारखी नसते.
त्यामुळे जिमसाठी एक तासाच्या स्लॉटसाठी पैसा भरले असले तरी सुरुवातीच्या काळात पूर्ण एक तास व्यायाम न करता १०-१५ मिनिटे व्यायाम करावा व व्यायामाचा सराव होत जाईल तशी तशी हलके हलके व्यायामाची वेळ वाढवत न्यावी.
व्यायाम केल्यावर हातपाय दुखणे, स्नायूमध्ये दुखणे सामान्य असले तरी शरीर पूर्णपणे आखडेपर्यंत, हलायला त्रास होईल अशी वेळ येईपर्यंत व्यायाम करू नये. व्यायाम करणे सुरू केल्यावर तो वेळेतच थांबवणे इष्ट ठरते. प्रयत्नांती परमेश्र्वर असे आपल्याकडे सांगितलेले आहे तसे प्रयत्नांनी आपली व्यायाम करण्याची क्षमता वाढवणे हे उत्तम.
वयाची सीमा
वयाच्या सीमेचा विचारही करणे आवश्यक असते. लहान वयापासून प्राणायाम करणे, चालायला जाणे, योगासने करणे याला फारशी हरकत नसते, पण जिमचा व्यायाम मात्र साधारणपणे १८ ते २० वर्षाच्या वयात जेव्हा शरीरातील सगळे धातू संपन्न झालेले असतात अशा वेळी सुरू केलेले चांगले, तसेच साधारण ७०-७५ वर्षांनंतर जिमचे व्यायाम बंद करणे चांगले.
कधीच जिममध्ये जाऊन व्यायाम केले नसल्यास साठीनंतर एकदम जिम करणे सुरू करू नये. व्यायाम प्रत्येकाने केला तर चालते पण जिम फार कमी वयातील व्यक्तीनी वा फार जास्त वयाच्या व्यक्तींनी करू नये.
आपल्या शरीराची फिगर अत्यंत देखणी असावी अशी सध्या १५-१६ वर्षे वयाच्या मुलामुलांची इच्छा असते. पण १५-१६व्या वर्षी शरीराचा पूर्णपणे विकास झालेला नसतो, अशा वेळी जिम सुरू करून फक्त शरीरातील स्नायू पुष्ट करण्याकडे लक्ष दिले तर या वयात शरीरात तयार होणाऱ्या अस्थी, मज्जा, शुक्र या महत्त्वाच्या धातूंकडे दुर्लक्ष होते व याचे अनेक दुष्परिणाम आजच्या या वयोगटातील मुलामुलींमध्ये दिसत आहेत. उदा. हॉर्मोन्स असंतुलन, केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, टक्कल पडणे, शरीरात ताकद नसणे, मनात उत्साह नसणे वगैरे.
प्रकृतीची सीमा
जिमला येणाऱ्या प्रत्येकाचे वय साधारणपणे सारखे असले तरी प्रकृतीनुसार त्यांनी कमी-अधिक व्यायाम करणे योग्य असते. कफ प्रकृतीची व्यक्ती जास्त व्यायाम करू शकते, व्यायामाने त्यांच्या शरीरात धातुक्षय होताना दिसत नाही. पण वात व पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायाम जपून करावा. अशा व्यक्तींनी ज्या व्यायामात हालचाल व्यवस्थित होईल पण फार प्रमाणात शक्तीव्यय होणार नाही असे व्यायाम करावे.
समयसीमा
व्यायाम किती वेळ करावा याबद्दल कुतूहल प्रत्येकाच्या मनात असते. जिमला जाणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की कुठलाही व्यायाम करत असताना श्र्वास जेव्हा थोडा जड होऊ लागतो, चेहऱ्यावर व हातापायांवर थोडा घाम येऊ लागतो तेव्हा व्यायाम थांबवावा. दमछाक होईपर्यंत कधीही व्यायाम करू नये.
तसेच कुठल्या वेळी व्यायाम करावा वा जिमला जावे याचाही विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार व्यायामासाठी सकाळची वेळ उत्तम असते. सकाळी आपल्या शरीरातील सर्व दोष व अवयव अशा परिस्थितीत असतात की या वेळात केलेल्या व्यायामाचा अधिकाधिक फायदा मिळू शकतो. सकाळी पावणेपाच-पाचच्या सुमाराला उठून नित्यकर्म आटोपल्यावर व्यायाम करणे उत्तम असते.
ज्याप्रमाणे सकाळी इग्निशन दिल्यावर गाड्या किंवा फॅक्टरी काम करायला सुरुवात करतात त्याप्रमाणे कफ-वाताच्या या वेळात व्यायाम केला तर आपल्या शरीराची अंगप्रत्यंगे काम करायला सुरुवात करतात. याचा अर्थ असा नाही की संध्याकाळच्या वेळी व्यायाम करू नये. संध्याकाळी व्यायाम केल्याने रिलॅक्स व्हायला तसेच व्यवस्थित झोप यायला मदत मिळते.
सकाळी मुळीच व्यायाम न करता फक्त संध्याकाळी व्यायाम करणे चुकीचे असते. व्यायामाला मुख्य वेळ सकाळची दिली पाहिजे, संध्याकाळचे व्यायाम दुय्यम असायला हवेत.
आहार
व्यायाम करणाऱ्यांनी स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. स्निग्ध भोजन अर्थात दूध, लोणी, तूप, भात डाळ, भाज्या वगैरे सर्व गोष्टी पचेल एवढ्या प्रमाणात आहारात ठेवणे अत्यंत आवश्यक असते. कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीरात वाताची वृद्धी करतो. त्यामुळे वात प्रमाणाबाहेर वाढून शरीराचे क्षरण होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
पण सध्याच्या काळात जिममध्ये जाणाऱ्यांना फक्त प्रोटिन्स घेणे यावरच भर दिलेला दिसतो, वेगवेगळ्या प्रकारचा मांसाहार करण्याचा, एनर्जी बार्स खाण्याचा सल्ला दिला जातो. सध्या प्रोटिन पावडर या पदार्थाचा तर ऊत आला आहे. प्रोटिन शेकमध्ये फळे, भाज्या वगैरेंबरोबर वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केला जातो.
या सगळ्यांचा दुष्परिणाम यकृत, किडनी वगैरेंवर होताना दिसतो. त्यामुळे जिम करत असताना फार पटापट मसल्स वाढवायचा प्रयत्न केला तर एक तर थकवा येतो किंवा काही तरी चुकीचे खाण्यात येते. याऐवजी व्यायाम हळूहळू वाढवला तर आहारात उत्तम गोष्टी घेऊनही बदल घडवून आणणे शक्य असते.
उदा. तांदूळ, गहू, ज्वारी वगैरे चांगल्या प्रकारच्या धान्यांचा समावेश करणे चांगले. या गोष्टी सेंद्रिय असण्याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. चांगल्या प्रकारची फळे व भाज्या खाण्यात असाव्या. रोज न चुकता चांगल्या प्रतीचे सेंद्रिय दूध चैतन्य कल्प किंवा स्त्री संतुलन कल्प घालून नियमाने घ्यावे.
दूध, तूप व लोणी शरीरातील प्रत्येक धातू व्यवस्थित तयार होण्यासाठी मदत करणारी आहेत असे आयुर्वेदाचे मत आहे. व्यायाम व्यवस्थित असला तर मांस, अस्थी, शुक्र या धातूंना या आहाराची मदत मिळू शकते.
सुका मेवा नियमित खाणे हेही जिमला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी रोज न चुकता बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता यांचा आहारात समावेश असावा. धातुपुष्टीसाठी संतुलनचा आत्मप्राश व मॅरोसॅन ही रसायने नियमित घेणे उत्तम. वात कमी करण्याच्या दृष्टीने व्यायामाच्या आधी हलक्या हाताने संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल लावणे उपयोगी ठरते.
अजून काही
जिम करणे हे जास्त मसल्स बिल्ड करण्यासाठी असते. स्त्रियांनी शक्यतो जिममध्ये जाऊन मसल्स बिल्ड करण्यापेक्षा इतर मशिन्स वापरणे इष्ट ठरते. त्यामुळे जिममधल्या प्रशिक्षकाकडून सगळे व्यायामप्रकार समजून घेऊन स्वतःला जमतील व मानवतील तेच व्यायाम स्त्रियांना करणे योग्य असते.
एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की स्त्री असो व पुरुष, प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची ताकद माहीत असते. त्यामुळे जिममधील प्रशिक्षकाने त्याच्या ज्ञानानुसार जे काही करायला सांगितलेले असेल त्यातील आपल्या प्रकृतीला जे झेपेल तेवढेच करणे योग्य असते. आपल्या शरीराला काय चालते काय नाही याची सर्वांत जास्त जाणीव त्या व्यक्तीलाच असते. त्यामुळे प्रशिक्षकाकडून समजून घेऊन आपल्या पद्धतीने व्यायाम करणे इष्ट ठरेल.
व्यायाम करत असताना शुद्ध हवा तसेच नैसर्गिक प्रकाश असणे आवश्यक असते. जिममध्ये या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत, त्यामुळे आठवड्यातून २-३ वेळा बागेत, मोकळ्या जागेत, मैदानात सायकल चालवणे, चालणे, जॉगिंग, योगासने करणे उत्तम आणि आठवड्यातून २-३ वेळ जिममध्ये जाऊन व्यायाम करणे चांगले. यामुळे दोन्हींत संतुलन साधायला मदत मिळते.
एकूणच कुठलाही व्यायामप्रकार केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, स्नायूंना मदत मिळते, वजन कमी होते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मानसिक ताण कमी होतो, एवढेच नव्हे तर व्यायाम करणाऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्र्वास वाढलेला दिसतो.
या सगळ्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर घ्यायचा असेल तर व्यायाम नियमित करता येईल अशा प्रकारचा असणे उत्तम. थोडे दिवस जिमला जाऊन व्यायाम करून नंतर सर्व सोडून देणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर दिसतात. असे न होण्यासाठी आयुर्वेदाच्या या नियमांचा नीट विचार करून नंतरच जिमची सुरुवात करावी.