राजकीय-सामाजिक परिवर्तनात देशोदेशीच्या विद्यार्थिवर्गाने नेहेमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोषातून अनेक भक्कम सिंहासनेही डळमळीत झाल्याचा इतिहास आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सर्बियातील सध्याच्या विद्यार्थी आंदोलनाने त्यामुळेच लक्ष वेधून घेतले आहे.
हा युरोपमधील विकसनशील देश. कला व संगीत हे येथील जीवनशैलीचे अंग. साधारण ७० लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील अडीच ते सव्वातीन लाख नागरिक राजधानी बेलग्रेडमधील ‘रिपब्लिक स्वेअर’ या मुख्य चौकात गेल्या शनिवारी (ता.१५) जमले होते. सरकारविरोधात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा तो कडेलोट होता.
एवढ्या मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडली ती नोव्ही सॅड येथे एक नोव्हेंबर २०२४ रोजी घडलेल्या दुर्घटनेतून. या शहरातील मुख्य रेल्वेस्थानकाचे काँक्रिटचे छत पडून १५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला व दोन गंभीर जखमी झाले. अर्थात हे निमित्त होते. मूळ प्रश्न हा देशातील लोकशाहीची गळचेपी आणि भ्रष्टाचार हा आहे. त्यातून साचत गेलेल्या असंतोषाचा हा उद्रेक आहे.
या घटनेला जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी करत गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ विद्यार्थ्यांनी विद्यापीठांचे कामकाज रोखले आहे, आंदोलने सुरू केली आहेत. प्राध्यापकांसह नागरिकांची साथही त्यांना मिळत आहे. याचे लोण नंतर संपूर्ण सर्बियामध्ये पसरले. सरकारी भ्रष्टाचार आणि प्रसारमाध्यमांवरील निर्बंध असे मुद्देही पुढे आले.
या आंदोलनाने १५ मार्च रोजी कळस गाठला. नोव्ही सॅड येथील दुर्घटनेतील मृतांची १५ संख्या आणि १५ तारीख लक्षात घेत या शांतता आंदोलनाला ‘फिप्टिन फॉर फिफ्टिन’ असे नाव दिले होते. यात तीन लाखांहून नागरिक सहभागी झाल्याचे काही खासगी संस्थांचे म्हणणे आहे, तर सरकारी दाव्यानुसार ही संख्या एक लाख सात हजार एवढीच होती. बेलग्रेडमध्ये झालेल्या देशाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे शांततापूर्ण आंदोलन असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
‘नोव्ही सॅड’मधील हे रेल्वेस्थानक १९६४ मध्ये बांधलेले आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’(बीआरआय) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत २०२१ ते २०२४ च्या मध्यापर्यंत या स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरणानंतर काही काळातच स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळून झालेल्या जीवितहानीला सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिक आणि त्यांच्या सरकारचा भ्रष्ट कारभार आणि लाचखोरी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थी करीत आहे.
चिनी कंत्राटदारांशी सरकारचे ‘आर्थिक’ व्यवहार असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही घटना म्हणजे वुचिक यांच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीचे प्रतिबिंब असल्याचा आरोप होत आहे.
वुचिक यांच्या विरोधात आंदोलन थांबविण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. अगदी आंदोलकांना लाच देण्यापासून किंवा धमकाविण्याचे प्रयत्न केवळ अयशस्वी झाले नाहीत, तर त्यांनी सर्बियन सरकारला आणखी कमकुवत केले आहे, असे दिसते.
अध्यक्षांनी तेथील दूरचित्रवाणीवाहिनीवरून केलेल्या भाषणात आंदोलनात सहभागी झालेले विद्यापीठातील प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या किंवा सर्बियाच्या भविष्यासाठी काम करत नाहीत, तर स्वार्थासाठी काम करीत असल्याचा आरोप केला.
प्राध्यापक आणि शिक्षकांचा उल्लेख करून ते म्हणाले, की आंदोलनातील या अन्य गटांपेक्षा विद्यार्थी आंदोलकांवर माझा जास्त विश्वास आहे, असे सांगून वुचिक यांनी फुटीची बीजे पेरली असली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे विद्यार्थ्यांच्या भावनांवरून समजते.
‘सरकारने त्यांचे काम योग्य प्रकारे करावे’, अशी आमची अपेक्षा आहे. कोणता पक्ष सत्तेवर आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. चार महिन्यांपासून न्यायापासून वंचित ठेवणारे सरकार आम्हाला नको.
आम्हाला देशात काम करणारे सरकार हवे, आहे, अशी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आर्त मागणी बरेच काही बोलून जाते. आंदोलकांची प्रचंड संख्या हा सरकारला एक इशारा आहे आणि त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहायला हवे. वुचिक यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे, याचेही हे निदर्शक आहे.