आपल्याला काही मिळाले की बरे वाटते पण द्यायची वेळ आली की नकोसे होते आणि म्हणूनच देणारा तो ‘देव’ असे समजले जाते. मदत, कर्ज घेताना आनंद होतो पण परत करण्याच्या वेळी नाना क्लृप्त्या लढवून टाळाटाळ करण्याचा प्रसंग येतो. हे सर्व मनुष्य स्वभावाला धरून साहजिकच घडत असते.
पण ज्याने आपल्याला दिले त्याच्याशी फसवाफसवी बरी नव्हे. जलतत्त्वाशिवाय जीवन नाही, किंबहुना पाण्यालाच ‘जीवन’ म्हणतात. माणसामाणसांतील आपुलकी, ओलावा हेच जीवन! पाण्यावाचून जगण्याची कल्पनाच करवत नाही. म्हणून वैज्ञानिक मंडळी मंगळ किंवा शुक्र ग्रहावर पाणी शोधण्याचा प्रयत्न करतात.
पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याने सूर्याचे जाणे सहा महिने उत्तरेकडे व सहा महिने दक्षिणेकडे असते. मकरसंक्रांतीच्या आरंभापासून ते कर्कसंक्रांतीच्या आरंभापर्यंत सूर्याची गती उत्तरेकडे असते म्हणून त्यास उत्तरायण म्हणतात. साधारण मार्गशीर्ष महिन्यात (२१ डिसेंबर) उत्तरायणास सुरवात होते व त्यात शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूंचा समावेश होतो.
आषाढ महिन्यापासून (२१ जून) दक्षिणायनास प्रारंभ होतो व त्यात वर्षा, शरद व हेमंत ऋतूंचा समावेश होतो. दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरुवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्ती परत घेण्यास सुरुवात करतो. हे सर्व निसर्गतः चक्राकार गतीने सुरू असते.
एकूण उन्हाळ्यात जलशक्ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झाले की उन्हाळ्याची तक्रार न करता आपल्या वागण्याने उन्हाळा कसा सुसह्य होईल हे पाहणे इष्ट ठरेल. सावकारापासून तोंड लपविण्यासाठी जसा छत्रीचा वापर करता येतो, तसेच सूर्याच्या उष्णतेपासून तात्पुरत्या संरक्षणासाठी पण छत्रीचा वापर करता येतो.
प्रत्येक प्राण्याच्या शरीराचे एक विशिष्ट तापमान असते. माणसाच्या शरीराचे तापमान सामान्यतः ९८.६ फॅरनहीट असते. पण त्यात बदल होऊ लागला की अस्वस्थता जाणवते. शरीरात जवळ जवळ दोन तृतीयांश पाणीच असते व त्यामुळे माणसाला ऊब जास्त आवडते. ऊब म्हणजे बाहेरील उष्णतेचा व मायेचा संबंध! शरीर आतून किंवा बाहेरून उष्णतेने तापू लागले की शरीरातील पाणी कमी होऊ लागते व जीव अस्वस्थ होतो.
शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले की एकूण जीवनाचेच संतुलन बिघडते. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे, लघवी कमी होणे, शौचाला-लघवीला जळजळ होणे, चक्कर येणे, याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते. पावसाळ्यातही रोगांची जास्ती काळजी घ्यावी लागते पण उन्हाळ्यात जरा जरी निष्काळजी राहिले तरी छोटे मोठे त्रास होण्याचा संभव अधिक असतो.
वाळ्याचे पडदे लावून थंडगार हवा खात बसणे, किंवा थंड सरबताची मजा लुटणे आणि पाण्यात डुंबत बसणे यापलीकडे बरीच काळजी घ्यावी लागेल. सकाळच्या थंड वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी लवकर उठणे, मोजका व्यायाम करणे फायद्याचे ठरेल.
एरवी वर्षभर इतरांना टोप्या घालण्याचे काम केले तरी उन्हाळ्यात न लाजता टोपीचा वापर स्वतः करावा. पूर्वी टोपीच्या आत कांदा ठेवत असत. आता ते जरी केले नाही तरी डोक्यावर चांगले हेअर ऑइल लावावे आणि रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्यात.
मुलांना सुट्ट्या असल्यामुळे परगावी जायचे असेल तर उन्हाच्या वेळचा प्रवास टाळावा. थंड हवेच्या ठिकाणी गेले तरी दुपारचे ऊन टाळावे. पळीभर पाण्याने तीन वेळा आचमन करण्याने जी तृप्ती मिळते त्याचा अनुभव उन्हाळ्यात नक्कीच घेता येईल. बाहेरून उन्हातून फिरून आले की उभ्या उभ्या आणि ढसाढसा थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक पिणे कटाक्षाने टाळावे.
मध-लिंबू-पाणी, गुलाबाचे सरबत, बडीशेप वाळा यांचे सरबत उन्हाळ्यात अवश्य घ्यावे. गॅस मिसळलेल्या रासायनिक वासांच्या बाटलीबंद शीत पेयांचे भूत बाटलीतच बंद करून ठेवावे. आधी जमवलेली शक्ती हेमंत ऋतूत उधळल्यासारखी जरी वापरली तरी उन्हाळ्यात शक्ती जपून वापरावी.
उन्हाळ्यात कोठल्या ना कोठल्या प्रकाराने शरीरात भरपूर पाणी जायची आवश्यकता असते. उन्हाळ्यात आलेला थकवा भरून काढण्यासाठी फळे व फळांचे रस खूप उपयोगी ठरतात. आइस्क्रीम खाल्ले तर पोटात दूधही जाऊ शकते, पण ते आइस्क्रीम दुधापासून बनविलेले असायला हवे. आइस्क्रीममध्ये टिपकागदापासून ते इतर अनेक वस्तूंची भेसळ अलीकडे होते.
उन्हाळ्यात चांगले व थोडे दूध अवश्य घ्यावे. आयुर्वेदशास्त्रानुसार, दूध व फळे सेवन करण्याच्या वेळात सुमारे दोन तासांचे अंतर ठेवावे, दूध व फळे एकत्र करून कधीच खाऊ नये. उन्हाळ्यात दूध घ्यावे हे खरे पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास जुलाब होऊ शकतात.
उन्हाळ्यात दूध चालते व फळेही चालतात तर मग दूध व फळे एकत्र करून का चालत नाही याचे उत्तर मिळणे अवघड असले तरी असे केल्यास फुप्फुसाचे वा त्वचेचे विकार होतात हे नक्की. त्यामुळे खाण्याचा रंग, सुगंध, काजू, बदाम वगैरे ड्रायफ्रूट टाकलेला मिल्कशेक घ्यायला हरकत नाही, पण फळे टाकलेला मिल्कशेक कधीच घेऊ नये, त्यातल्या त्यात सीताफळ मिल्कशेक, चिकू मिल्कशेक, आंबा मिल्कशेक वगैरे कधीच घेऊ नये. तसेच मिक्स फ्रूट मिल्क शेक घेणेही टाळावे.
पिकलेला आंबा तर भर उन्हाळ्यातच मिळतो पण आंबा आहे उष्ण गुणाचा. त्यामुळे लहान मुलांनी आंबे खाल्ल्यावर त्यांना नको त्या ठिकाणी गळवे आलेली दिसतात. बऱ्याच लोकांना आंबा मानवतो, त्यामुळे शरीर पुष्ट होते, वजन वाढते, शरीरातील वीर्यधातू वाढतो.
आंबा पचायला हवा असेल व आंब्याचा दोष न लागता त्यातील अमृततत्त्व मिळवायचे असेल तर आंब्याचा रस तूप टाकून खावा. तांबडा भोपळा बारा महिने खाण्यासारखा असतो. तांबडा भोपळा सेवन केल्यास मूत्रवृद्धी होते, शरीरातील क्षार बाहेर पडायला मदत होते. प्रत्येकाने उन्हाळी फळे अवश्य खावीत. झाडावर पिकलेली द्राक्षे तर उत्तम असतात.
उन्हाळ्यात सेवन करण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे चंदनाचे वा गुलाबाचे सरबत. गुलाबाचा वा चंदनाचा अर्क, साखर एकत्र करून बनविलेल्या सिरपमध्ये ऐन वेळी नुसते पाणी घालून सरबत करता येते.
उन्हाळ्यात कलिंगडे भरपूर खावीत, कलिंगडातील बिया मात्र नक्की काढाव्यात. कलिंगडाच्या बिया वाळवून सोलून, मीठ टाकून परतून खाता येतात.
असे म्हणतात की कलिंगडांची गोडी व गराचा लालभडकपणा वाढविण्यासाठी त्याला साखरेच्या पाकाची व लाल रंगाची इंजेक्शने दिलेली असतात. त्यामुळे घरी आणलेले कलिंगड अति गोड व लाल वाटल्यास त्यात इंजेक्शन दिलेले आहे असा संशय घेऊन त्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यास कार्यवाही होऊ शकते.
असे प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनीच मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून यातून होणाऱ्या रोगांना प्रतिबंध घालता येईल. सध्या खूप पदार्थात भेसळ होत असताना दिसते पण अशा तऱ्हेची फळांमध्ये होणारी भेसळ सर्वांच्या मदतीने थांबविणे आवश्यक आहे. कलिंगड खाणे शुक्रवृद्धीच्या मात्र आड येते.
अशा प्रकारे आहार-आचरणात काळजी घेतल्यास येणारा उन्हाळा सुसह्य व्हायला निश्र्चितच मदत होईल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)