इमॅजिका पार्कने शालेय सहली कायमच्या बंद कराव्या
esakal March 21, 2025 12:45 AM

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना घेऊन खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती. या वेळी घणसोली शाळा क्र. ७६ येथील हिंदी माध्यमातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेला इमॅजिका पार्क व्यवस्थापन, महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी इमॅजिक पार्कच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन शालेय सहली कायमच्या बंद करण्यास सांगितले आहे अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात न्याय मागण्यासाठी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने इमॅजिका पार्कचे व्यवस्थापक शिवराज नायर यांची भेट घेतली. शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक ठिकाणीच शाळा सहल नेऊ शकतात, असा महाराष्ट्र सरकारचा निर्णय असताना इमॅजिका पार्क या सहली आयोजित कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या फायद्यासाठी इमॅजिका पार्क लहान मुलांचा जीव धोक्यात का घालते, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. इमॅजिका पार्ककडे झालेल्या घटनेचा अहवाल मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मागवला असता इमॅजिका पार्क व्यवस्थापनाकडे असा अहवाल उपस्थित नसताना बघून सर्वांनी राग व्यक्त केला. या वेळी उपस्थित वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना इमॅजिका पार्कवर गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली. इमॅजिका पार्कने या पुढे शासन निर्णयानुसार शालेय सहली आयोजित करू नये, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही गजानन काळे यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.