ST Driver Assaulted : एसटी चालकाला मारहाण आली अंगलट; तिघांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा
esakal March 21, 2025 02:45 PM

कऱ्हाड : रस्त्यात मोटार आडवी लावून एसटी थांबवून चालकाला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करत धमकी दिल्याप्रकरणी तिघांना दोषी धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी त्यांना तीन वर्षे कारावास, सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय हरिबा पाटील, कृष्णा सखाराम पाटील व सुरेश आनंदा पाटील अशी शिक्षा झालेल्यांची नावे असल्याची माहिती सहायक सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, एसटी चालक विकास जाधव हे सहा सप्टेंबर २०१९ मध्ये वाहक संतोष सावंत यांच्यासह चिपळूण-मिरज एसटीमधून प्रवासी घेऊन जात होते. कोयनानगर ते पाटण रोडवर येराडच्या पुढे अर्धा किलोमीटरवर पाटण बाजूकडे अचानक चारचाकी चालकाने एसटीला गाडी आडवी मारली. एसटी चालकाने

मोटार व्यवस्थित चालवा, अपघात होईल असे म्हटले, म्हणून मोटार चालकाने रस्त्यातच गाडी आडवी लावून बस थांबवली. यावेळी संजय पाटील, कृष्णा पाटील व सुरेश पाटील यांनी आपसात संगनमत करून बसमध्ये घुसून केबिनमधील चालक विकास जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करत धमकी दिली.

याबाबत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात पाटण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक जिल्हा सरकारी वकील कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर. डी. परमार यांनी खटल्यातील शिक्षेवर युक्तिवाद केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.