RBI: देशातील दोन मोठ्या बँकांवर आरबीआयची कारवाई; ठोठावला लाखोंचा दंड, ग्राहकांना फटका बसरणार का?
esakal March 28, 2025 07:45 AM

RBI Fines HDFC Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर आरबीआयची नजर असते. यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवरही कडक कारवाई केली जाते.

नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने बँकांना लाखो आणि कोटींचा दंड ठोठावल्याचे अनेकवेळा घडले आहे. आता RBI ने कडक कारवाई करत देशातील दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँक आणि पंजाब आणि सिंध बँक या दोन बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे.

नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला दंड ठोठावला आहे. RBI ने HDFC बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर आरबीआयने पंजाब आणि सिंध बँकेला 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दंड आकारण्याचे कारण काय?

देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेला KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल RBI ने दंड ठोठावला आहे. बँकेला दंड ठोठावल्यानंतर आरबीआयने एचडीएफसी बँकेलाही कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला आहे.

पंजाब आणि सिंध बँकेला दंड लावण्याचे कारण स्पष्ट करताना, आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकांनी दिलेल्या मोठ्या कर्जांची माहिती गोळा करणे, सामान्य लोकांना बँकिंग सेवा देणे आणि त्यांच्यासाठी मूलभूत बचत बँक खाती (बीएसबीडीए) उघडण्याशी संबंधित काही निर्देशांचे पालन न केल्यामुळे 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही बँकांवर दंड आकारल्याने बँकांच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.